मातृपूजन संस्कार सोहळ्यात मुलांनी आईचे पाय धुवून घेतले दर्शन; मातांना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 12:50 PM2023-04-07T12:50:59+5:302023-04-07T12:51:18+5:30
चिमुकल्यांनी आपल्या आईची पावले चिमुकल्या हातात घेऊन, पाण्याने स्वच्छ धुवून, हळदीकुंकू पुष्प वाहून दर्शन घेतले
सांगवी (बारामती) : देशाची आधुनिकतेकडे वाटचाल होत असताना मोबाईल, टीव्ही व सोशल मीडियाच्या युगात मुलांवरील संस्कार कमी होऊन ते हरवत चालल्याचे पाहायला मिळतात. परंतु, मातृपूजन संस्कार सोहळ्याच्या माध्यमातून पुनश्च एकदा आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख होऊन पुन्हा मुलांच्यात ते संस्कार दिसून यावे यासाठी सांगवीच्या मराठी शाळेने मातृपूजन संस्कार सोहळ्याचा उपक्रम राबवत छोटासा प्रयत्न केला. आई-वडिलांनंतर मुलांवर संस्कार गिरवणारे शिक्षक असतात. स्वत:ला विसरून मुलांना घडविणारी,संस्कार करणारी ती आई असते, मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, तिचे आईपण तिच्या अपत्याविषयीच्या असीम प्रेमामध्ये सामावलेले असते.
मुलाला चांगला माणूस म्हणून घडविण्याचे आव्हान आईपुढे कायम आहे. आज समाजाला सर्वाधिक गरज आहे ती सुसंस्कारित पिढीची. आईने मुलावर संस्कार करणे, ही आजवर सहज साध्य होणारी गोष्ट होती. आज मात्र ती गोष्ट हरवत चालली असल्याचे वाटते. मुलांना कशाततरी गुंतवून ठेवणे म्हणजे त्यांना घडविणे नाही. आईने मुलांवर केलेल्या संस्कारांची वीण एवढी घट्ट असायला हवी, की कोणत्याही परिस्थितीत ती तुटता कामा नये. यासाठीच हा मुलांच्यात संस्कारमय वातावरणात निर्मितीसाठी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत गुरुवार (दि. ६) रोजी "मातृपूजन संस्कार सोहळ्याचे" आयोजन करण्यात आले होते.
लहान मुलं ही संस्कारक्षम असतात त्यांच्यावर केलेले संस्कार चिरकाल टिकतात. ही बाब डोळ्यासमोर ठेवून शाळेच्या वतीने या संस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मातृसंस्कार सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर माता पालकांची उपस्थिती होती. यावेळी शाळेच्या आवारामध्ये झालेल्या या सोहळ्यामध्ये जवळपास 200 मातांनी सहभाग घेतला.
चिमुकल्यांनी आपल्या आईची पावले चिमुकल्या हातात घेऊन, पाण्याने स्वच्छ धुवून ,रूमालाने पुसून हळदीकुंकू पुष्प वाहून दर्शन घेतले. मातांनीही मनोभावे आपल्या लाडक्यांना आशीर्वाद दिले. या भावनिक दृश्याने काही मातांना अश्रू अनावर झाले. यावेळी अनेक मातांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना शाळेने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.