राज्यातील 18 कारखान्यांचे ऑक्सिजन प्रकल्प महिनाभरात, यंत्रसामग्रीचे पैसेही केले जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 11:03 AM2021-05-29T11:03:18+5:302021-05-29T11:03:44+5:30
oxygen projects News: राज्यातील १८ साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्रकल्पासाठी परदेशी कंपन्यांकडे १२ कोटी ७० लाख रुपये जमा केले आहेत. रेडी टू यूज यंत्रसामग्री असलेले हे प्रकल्प महिनाभरात सुरू होऊन त्यातून किमान १५०० ऑक्सिजन सिलिंडर दररोज उत्पादित होतील.
पुणे : राज्यातील १८ साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्रकल्पासाठी परदेशी कंपन्यांकडे १२ कोटी ७० लाख रुपये जमा केले आहेत. रेडी टू यूज यंत्रसामग्री असलेले हे प्रकल्प महिनाभरात सुरू होऊन त्यातून किमान १५०० ऑक्सिजन सिलिंडर दररोज उत्पादित होतील. यातील धाराशिव साखर कारखान्याचा प्रकल्प सुरूही झाला आहे. त्यासाठी त्यांना २ कोटी रुपयांचा खर्च आला. त्यांचीच क्षमता दररोज १००० ऑक्सिजन सिलिंडर तयार करण्याची आहे. संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यातील हा एकमेव ऑक्सिजन प्रकल्प आहे.
हवेतील ऑक्सिजन खेचून घेऊन त्यापासून वैद्यकीय कारणासाठीचा शुद्ध ऑक्सिजन या ‘रेडी टू यूज’ प्रकल्पांमधून तयार होतो. त्यासाठी विशिष्ट यंत्रसामग्री लागते. त्याचीच मागणी संबधित यंत्र उत्पादित करणाऱ्या परदेशी कंपन्यांकडे या कारखान्यांनी नोंदवली आहे. धाराशिवचा प्रकल्प मोठा असला तरी अन्य कारखान्यांचे प्रकल्प ५० लाख ते दीड कोटी रुपये खर्चाचे आहेत. त्यापासून दररोज कमाल ९० व किमान ५० ऑक्सिजन सिलिंडर तयार होतील.
साखर कारखान्यांनी परिसराच्या सामाजिक कामात नेहमीच सहयोग दिला आहे. कोरोना काळात त्यांनी दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी स्पृहणीय आहे.
-शेखर गायकवाड, साखर आयुक्त
ऑक्सिजन प्रकल्पाची मागणी नोंदवणारे खासगी व सहकारी साखर कारखाने
nधाराशिव, विठ्ठलसाई, नॅचरल शुगर विठ्ठलसाई (तीनही उस्मानाबाद)
nद्वारकाधीश (नाशिक),
nपांडुरंग सहकारी (सोलापूर),
nपूर्णा (हिंगोली),
nभाऊसाहेब थोरात (संगमनेर)
nशंकरराव काळे (कोपरगाव),
nअजिंक्यतारा (सातारा),
nदूधगंगा वेदगंगा (कोल्हापूर),
nजवाहर सहकारी (हातकणंगले),
nराजारामबापू (सांगली),
nदत्त सहकारी (शिरोळ कोल्हापूर)
nपराग ॲग्रो (शिरूर, पुणे),
nश्रीनाथ म्हस्कोबा (पुणे),
nबारामती ॲग्रो (बारामती, पुणे),
nदत्त इंडिया (सांगली),
nविठ्ठलराव विखे (प्रवरानगर, अहमदनगर) आणि
nव्यंकटेशकृपा शुगर (पुणे )