चाकण येथे प्रसुती दरम्यान महिलेचा बाळासह मृत्यू, तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 03:33 PM2019-05-10T15:33:23+5:302019-05-10T15:36:46+5:30
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
चाकण : महिलेची प्रसुती करताना मुलीच्या अर्भकासह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना चाकण येथे घडली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून तीन डॉक्टरांवर चाकण पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. सपनाच्या मृत्यूनंतर काही काळ नातेवाईक संतप्त झाल्याने काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून हॉस्पिटलजवळ पोलीस बंदोबस्त देण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी ( दि. ९ ) रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. सपना सुधीर पवळे ( वय ३०, रा. वाकळवाडी, ता.खेड, जि. पुणे, सध्या रा. फ्लॅट नं. ३०२, सुगंध बिल्डिंग इकोग्राम, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे ) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मयत सपनाचे पती सुधीर मच्छीन्द्र पवळे ( वय ३०, रा. वाकळवाडी, ता. खेड, जि. पुणे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी चाकण येथील अरगडे हॉस्पिटलचे डॉ. असित अरगडे, क्रिटिकेअर हॉस्पिटलचे डॉ. राजेश घाटकर व डॉ. सुपेकर यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिचीनुसार, सपनाला प्रसुतीसाठी डॉ.अरगडे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी औषधोपचार करताना अधिक त्रास होऊ लागल्याने महिलेला क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. येथे मात्र प्रसुती करताना अर्भक मुलगी मृत झाली. त्यानंतर सपनाही गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिला तपासण्या पूर्वीच मयत झाली असल्याचे घोषित केले. हलगर्जीपणे उपचार, इंजेक्शन, चुकीच्या गोळ्या व सलाईन दिल्याने सपनाचा मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूस जबाबदार झाल्याने तिन्ही डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------;-