Pimpri Chinchwad | ऐन सणासुदीत जाधववाडीतील चौदा तास वीज गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 11:22 AM2022-10-31T11:22:39+5:302022-10-31T11:25:58+5:30
जाधववाडी परिसरात चौदा तास वीज गायब...
जाधववाडी (पुणे) : ऐन दिवाळी सणासुदीच्या दिवसांत रावेत येथील जलवाहिनी फुटल्यामुळे इतर परिसरासहित जाधववाडी येथील पाणीपुरवठा दोन दिवस ठप्प झाला होता. त्यामुळे नागरिक हैराण असतानाही सकाळपासून वडाची तालीम जाधववाडी येथील विजेच्या ट्रान्सफॉर्मरजवळील असलेली भूमिगत वीज तार जळाली. त्यामुळे चौदा तास वीज गायब होती.
वडाची तालीम जाधववाडी येथील विजेचा ट्रान्सफॉर्मरजवळील असलेली भूमिगत वीज वाहिनी शनिवारी सकाळी खंडित झाली. त्यामुळे ७ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत दिवस भर परिसरात वीज गायब झाली होती. त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा झाला नाही. वीज नसल्यामुळे घरून काम करणारे आयटी व इतर व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागला. पाणी नसल्यामुळे आणि वीजही नसल्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
नागरिकांनी महावितरण कार्यालयात सकाळपासून चौकशी करण्याचा प्रयत्न केला; परंतु तेथूनही वीज कधी सुरू होईल, याबाबत समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. त्यामुळे नागरिक दिवसभर विजेच्या प्रतीक्षेत होते. दुपारनंतर महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी दुरुस्ती सुरू केली. रात्री नऊ वाजेदरम्यान तारा जोडून झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला.
ऐन सणासुदीत गैरसोय
जाधववाडी परिसरातील नागरिकांना किती दिवस समस्यांना सामोरे जावे लागेल, याबाबत प्रश्न निर्माण होत आहे. परिसरात अनियमित पुरवठा होत आहे, तसेच रस्त्यात खड्डे पडले आहेत. त्यामुळे विविध समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.