"युपीएच्या काळात प्रत्येक मंत्री स्वत:ला पंतप्रधान समजत होता आणि पंतप्रधानांना..," अमित शाहंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 10:36 PM2023-02-18T22:36:19+5:302023-02-18T22:37:06+5:30
शनिवारी गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात modi@20 पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं एकाच मंचावर आले होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला. यानंतर शनिवारी गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात modi@20 पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं एकाच मंचावर आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीबाबत माहिती दिली. “मोदींना जेव्हा मुख्यमंत्री बनवलं तेव्हा संपूर्ण भारतातील मुख्यमंत्र्यांमध्ये ते एकमेव असे मुख्यमंत्री होते जे कधी निवडणूकच लढले नव्हते. सरपंचपदाचीही निवडणूक त्यांनी लढले नव्हते. त्यांनी भाजपच्या संघटनेचं काम केलं. भाजपनं अचानक त्यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला,” असं अमित शाह यावेळी म्हणाले.
“२००४ ते २०१४ ला कालखंडात युपीए सरकारनं देशात राज्य केलं. युपीए सरकार हे असं सरकार होतं. ज्यात प्रत्येक मंत्री आपल्याला पंतप्रधान मानत होता आणि पंतप्रधानांना कोणी पंतप्रधान मानत नव्हतं. पॉलिसी पॅरालिसिस झालं होतं. पाकिस्तानातून दहशतवादी घुसून आपल्या जवानांचं शिर कापून त्यांचा अपमान करत होतो आणि दिल्लीत शांतता होती. १२ लाख कोटींचे भ्रष्टाचार देशासमोर एकापाठोपाठ आले. पंतप्रधानांनाच विदेशातही सन्मान नव्हता. ते विदेशात लिहिलेलं भाषण वाचत होते. कधी थायलंडचं भाषण सिंगापुरात तर कधी सिंगापूरचं भाषण थायलंडमध्ये. देशाला अपमान सहन करावा लागला. तेव्हा मोदींच्या नावाची घोषणा झाली आणि निवडणुका लाटेत बदलल्या. तेव्हा भाजपला पहिल्यांदा संपूर्ण बहुमत मिळालं,” असं अमित शाह म्हणाले.
काळ सुवर्णाक्षरात लिहिला जाईल
“२०१४ ला मोदी पंतप्रधान झाले आणि त्यांनी सिद्ध केलं की हीच मल्टीपार्टी पार्लमेंट्री डेमोक्रेटिक सिस्टमद्वारे भारत संपूर्ण जगात पहिल्या स्थानी पोहोचू शकेल. २०१४ ते २०२२ पर्यंत काळ हा सुवर्णाक्षरात लिहिला जाईल. ७० वर्ष ज्यांनी राज्य केलं त्यावेळी लोक त्रास आणि समस्यांना सामोरे जात होते. मात्र आज परिस्थितीत तशी नाही. गरीबांना घरं मिळाली आहेत. गॅसही मिळाला आहे. मोदींच्याच काळात हे शक्य झालं आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.