दुरावा कायमचा, पण नाते टिकून, पतीचा न्यायिक फारकतीचा अर्ज मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 02:05 AM2019-02-08T02:05:52+5:302019-02-08T02:06:29+5:30
सततच्या वादामुळे आपापसातील संवाद तर थांबला आहे. त्यामुळे त्याला तिच्यापासून वेगळे राहायचे आहे. पण त्यांना नाते संपवायचे नव्हते.
पुणे - सततच्या वादामुळे आपापसातील संवाद तर थांबला आहे. त्यामुळे त्याला तिच्यापासून वेगळे राहायचे आहे. पण त्यांना नाते संपवायचे नव्हते. त्यामुळे पतीने न्यायिक फारकतीसाठी (ज्युडिशियल सेपरेशन) दाखल केलेला अर्ज कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीशांनी मंजूर केला.
या निर्णयामुळे जोडपे एकमेकांपासून कायमचे दुरावले आहेत. पण त्यांच्यातील नाते कामय आहे. या प्रकरणात पती एका वर्षानंतर घटस्फोटासाठी दावा देखील दाखल करून शकतो. तन्मय आणि रुपाली (नावे बदललेली) अशी या जोडप्याची नावे. त्यांचे मे २००७ मध्ये लग्न झाले. त्यांना एक मुलगीदेखील आहे. लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच ती त्याला तू मला आवडत नाहीस. मी कमवती असून मला तुझ्यापेक्षा चांगला नवरा मिळाला असता, असे म्हणत होती. मात्र तरीही तो तिच्याकडून होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करून तो तिच्याबरोबर संसार करत होता. पण ती मुलगी आणि सासू सासºयांचा संभाळ करेना. तसेच तिच्या माहेरच्या लोकांचाही त्यांच्या संसारात ढवळाढवळ होती. त्या दोघांनी वेगळे राहावे म्हणून तिचा हट्टही त्याने पुरा केला. मात्र तो कमवता नसल्यामुळे त्याला त्याच्या आई-वडिलांकडून पैसे घ्यावे लागत होते. त्यामुळे तो कंटाळून पुन्हा आई-वडिलांकडे परत आला. तिने त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली. त्याच्याकडून पोटगीची रक्कम मिळावी म्हणून दाखल केलेल्या दाव्यात तीन हजार रुपयांची पोटगीही तिला मंजूर झाली. ती रक्कमही त्याचे वडील देत होते. तिच्याकडून होणारा त्रास वाढल्यानंतर त्याने अॅड. प्रगती पाटील यांच्यामार्फत न्यायिक फारकतसाठी कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला होता.
रद्द करणे हीच तिला शिक्षा
पतीपेक्षा चारपटीने जास्त कमवत असूनही त्याच्याकडून पोटगीची रक्कम मिळावी म्हणून तिने न्यायालयात दावा दाखल केला होता. ती कमवती असूनही न्यायालयात पोटगीच्या रकमेसाठी दावा दाखल केल्याचे सिद्ध झाले. आर्थिक सक्षम असूनही पोटगीसाठी न्यायालयाचीच फसवणूक करत असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने तिची पोटगी रद्द करण्याचा आदेश दिला. तिची पोटगी रद्द करणे हीच तिला शिक्षा आहे, असे निकालात नमूद करण्यात आले असल्याची माहिती अॅड. पाटील यांनी दिली.