PMC: पुण्यात धुळीचे प्रमाण वाढले; महापालिकेचे याकडे सर्रास दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 10:24 IST2025-02-22T10:23:55+5:302025-02-22T10:24:42+5:30
प्रदूषण वाढले असून, ते कमी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी उपाययोजना कराव्यात, असे आदेश दिले होते

PMC: पुण्यात धुळीचे प्रमाण वाढले; महापालिकेचे याकडे सर्रास दुर्लक्ष
पुणे: शहरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी धुळीचे प्रमाण वाढले आहे. ते कमी करण्यासाठी उपाययोजना न करणाऱ्या २०८ बांधकाम प्रकल्पांचे काम थांबविण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यापेकी केवळ ४० ते ५० बांधकाम प्रकल्पांनी उपाययोजना केल्या आहेत. उर्वरित सुमारे १५० हून अधिक बांधकाम प्रकल्पांनी याबाबत कोणत्याही उपाय योजना केल्या नाहीत. काही ठिकाणी तर बांधकाम स्थगिती असतानाही काम सुरू आहे. त्यामुळे पुणे महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे स्पष्ट हाेते. आता बांधकाम विभाग दाेषींवर काय कारवाई करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहरात बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामुळे प्रदूषण वाढले असून, ते कमी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक, वास्तूविशारदांनी उपाययोजना कराव्यात, असे आदेश दिले होते. त्यासाठीचे ई-मेल देखील संबंधितांना केले हाेते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीचे पालन करण्यास सांगितले होते. पण, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. बांधकाम विभागातील अभियंत्यांनी सर्वेक्षण करून ज्या ठिकाणी धूळ रोखण्यासाठी उपाययोजना केली नाहीत, अशा बांधकाम प्रकल्पांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्या नोटीशीत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २६७ व महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५४च्या अधिकारानुसार ताबडतोब बांधकाम थांबवावे. अन्यथा पोलिसांच्या माध्यमातून कारवाई केली जाईल, असे नाेटीशीत नमूद केले होते. त्यानुसार धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना न करणाऱ्या २०८ बांधकाम प्रकल्पाचे काम थांबविण्यात आले. त्यापैकी केवळ ४० ते ५० बांधकाम प्रकल्पांनी याबाबत उपाययोजना केल्या आहेत. त्यांना बांधकाम सुरू करण्यास पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने परवानी दिली आहे. मात्र १५० हून अधिक बांधकाम प्रकल्पांनी धुळीचे प्रदूषण कमी करण्याबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत.
पुणे महापालिकेने धुळीच्या प्रदूषणप्रकरणी २०८ प्रकल्पाचे बांधकाम थांबवण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. त्यापैकी सुमारे ४० ते ५० प्रकल्प याबाबत उपाययोजना केल्या आहेत. त्यांना बांधकाम करण्यास परवानी दिली आहे. उर्वरित बांधकाम प्रकल्पांनी उपाय योजना केल्या की नाही. त्याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. - राजेश बनकर, अधीक्षक अभियंता, बांधकाम विभाग, पुणे महापालिका