धुळीच्या साम्राज्याने शहरवासीय संभ्रमात
By Admin | Published: April 7, 2015 05:42 AM2015-04-07T05:42:07+5:302015-04-07T05:42:07+5:30
अवकाळी पावसानंतर परिसरात झालेल्या धुळीच्या साम्राज्यामुळे रहिवाशांमध्ये भयमिश्रित कुतुहल पसरले आहे. दोन दिवसांत धुळीमुळे तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
पिंपरी : अवकाळी पावसानंतर परिसरात झालेल्या धुळीच्या साम्राज्यामुळे रहिवाशांमध्ये भयमिश्रित कुतुहल पसरले आहे. दोन दिवसांत धुळीमुळे तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
दुबईसह आखाती देशांमध्ये आलेल्या धुळीच्या वादळाचा प्रभाव म्हणून याच दिशेकडून भारताकडे वाहणाऱ्या वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट आले आहेत. धूलिकणांसह आलेल्या या वाऱ्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात रविवारपासूनच धूसर वातावरण झाले आहे. रविवारी पहाटे धुके दाटून आल्यासारखी स्थिती होती. दुपारनंतरही स्थिती आहे अशीच राहिल्याने हे वातावरण वेगळेच असल्याची जाणीव सर्वांना झाली. परिसरातील लोणावळा, वडगाव, तळेगाव, चांदखेड, देहूरोड, देहू ते पिंपरी-चिंचवडच्या सर्व परिसराला या वातावरणाने कवेत घेतले आहे. हीच स्थिती ताम्हिणी घाट ते मुळशी, पौड, घोटावडे, माण, हिंजवडी, कासारसाई, मारुंजी परिसरामध्ये सोमवारीदेखील कायम राहिली आहे. त्यामुळे दृश्यता कमी झाली असून, ऐन उन्हाळ्यात धुकेसदृश स्थिती झाली आहे.
वृद्धांनीही अशा प्रकारे दिवसभर दाटून येणारे धुळीचे वातावरण अनुभवले नव्हते. कधी अवकाळी पाऊस, तर कधी उष्ण वाळवंटात असल्यासारखा धूळमय वातावरणाचा अनुभव काहींसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे. (प्रतिनिधी)