गावाचा विकास हे मतदाराचे कर्तव्य
By admin | Published: January 25, 2017 11:46 PM2017-01-25T23:46:59+5:302017-01-25T23:46:59+5:30
लोकशाहीला भक्कम करण्यासाठी प्रत्येक मतदाराने जागृत होणे आवश्यक आहे. मतदान करणे हे आपले दायित्व समजून सर्व मतदारांनी मतदानासाठी पुढे आले पाहिजे
घोडेगाव : लोकशाहीला भक्कम करण्यासाठी प्रत्येक मतदाराने जागृत होणे आवश्यक आहे. मतदान करणे हे आपले दायित्व समजून सर्व मतदारांनी मतदानासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी मतदान जनजागृती दिनानिमित्त शिनोली (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर विद्यामंदिर व टी. एस. बोराडे महाविद्यालयाने काढलेल्या रॅलीला मार्गदर्शन करताना केले.
या महाविद्यालयाने मतदान जनजागृती दिनानिमित्त रांगोळी, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा घेतल्या. सकाळी संपूर्ण गावातून रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते झाली. या वेळी प्रांत अधिकारी कल्याणराव पांढरे, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटशिक्षणाधिकारी रामदास पालेकर, नायब तहसीलदार विजय केंगले, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मधुकरअप्पा बोऱ्हाडे, शंकरशेठ शहा, उपसरपंच सुनील बोऱ्हाडे, प्राचार्य डी. डी. जाधव हे
उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘जिल्ह्यात निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. १२ वीच्या काही मुलामुलींना पहिल्यांदा मतदान करण्याचा अधिकारी प्राप्त झाला आहे. त्यांनी आज मतदान ओळखपत्र घेताना, निवडणुकीमध्ये योग्य उमेदवाराची निवड करणे, कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडणे, मतदानाचा हक्क बजावणे, तालुका व गावाचा विकास करणे हे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य असल्याचे लक्षात ठेवले पाहिजे.’’
या वेळी पहिल्यांदाच मतदार यादीत नाव समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना मतदार ओळखपत्र देण्यात आले. तसेच स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन बक्षीस मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रके देण्यात आली. (वार्ताहर)