गतिमान वाहतूक, २४ तास पाणी!

By admin | Published: December 3, 2015 03:37 AM2015-12-03T03:37:40+5:302015-12-03T03:37:40+5:30

महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीसमोर सादर केलेल्या ३ हजार ५०० कोटी रुपयांच्या स्मार्ट आराखड्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुधारणा

Dynamic transport, 24 hours water! | गतिमान वाहतूक, २४ तास पाणी!

गतिमान वाहतूक, २४ तास पाणी!

Next

- स्मार्ट सिटीचा आराखडा सादर

पुणे : महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीसमोर सादर केलेल्या ३ हजार ५०० कोटी रुपयांच्या स्मार्ट आराखड्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुधारणा, मल्टीलेव्हल पार्किंग, वाहतूक नियंत्रण केंद्र याच्या मदतीने गतिमान वाहतूक, २४ तास पाणीपुरवठा यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर मॉडेल एरिया म्हणून विकसित करण्यासाठी निवड झालेल्या औंध, बाणेर भागासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद या आराखड्यात करण्यात आली आहे.

स्मार्ट सिटीच्या आराखड्यामध्ये नागरिकांचा सहभाग असला पाहिजे, अशी अट केंद्र शासनाकडून घालण्यात आली होती. त्यानुसार वेगवेगळया टप्प्यांवर नागरिकांकडून सुचना, शिफारशी व त्यांचे मते आराखडा तयार करताना मागविण्यात आली होती. नागरिकांनी स्वच्छ व सुंदर पुण्याला पहिली पसंती दिली होती. तसेच वाहतूक समस्या प्राधान्याने सोडविली जाण्याची शिफारस केली होती. त्यानुसार स्मार्ट सिटीच्या प्रस्तावित आराखड्यामध्ये वाहतूक समस्या, पाणीपुरवठा याला प्राधान्य देण्यात आले आहे.
शहराची वाहतूक व्यवस्था अधिक गतीशील व्हावी, यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर दिला आहे. बस थांब्याची सुधारणा, बसची देखभाल, बसमधील आयटीएमएस यंत्रणा याकरिता १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचबरोबर वाहतूक नियंत्रणासाठी ९५ कोटी, मल्टीलेव्हल पार्किंग सुविधेसाठी ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकंदरीत वाहतूक व्यवस्थेवर ५८५ कोटी रुपयांपर्यंत खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.
शहराला २४ तास पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासठी ३५५ ते ३७५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, एसटीपी केंद्रातून ऊर्जा निर्मितीसाठी १० कोटी व त्याच्या देखभाल दुरूस्तीसाठी ६५ कोटी अशी ४५० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित केला आहे. त्यामुळे शहराला मीटर पद्धतीने २४ तास पाणीपुरवठा करता येऊ शकणार आहे.
स्मार्ट सिटी आराखड्यामध्ये मॉडेल एरिया म्हणून डेव्हलप करण्यासाठी एक क्षेत्र निवडण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार पुणे महापालिकेने औंध, बाणेर भागाची त्यासाठी निवड केली आहे. त्यानुसार तिथे स्मार्ट सिटीच्या संकल्पांची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याकरिता एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नदीसुधारणा, सोलर एनर्जी, स्मार्ट मीटरिंग, घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यांचे सुसूत्रीकरण, वाहनतळ, देखभाल दुरूस्ती, पाण्याचा पुनर्वापर आदी प्रयोग तिथे राबविले जाणार आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पाचा सविस्तर आराखडा लवकरच संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे.

असा होईल औंध-बाणेरचा मॉडेल विकास
1) मॉडेल एरिया म्हणून निवडलेल्या औंध-बाणेर येथे स्मार्ट सिटीच्या संकल्पनांचे प्रयोग केले जाणार आहेत. तेथील यशस्वीतेनंतर ते संपूर्ण शहरात राबविले जाणार आहेत. औंधमधून जाणाऱ्या नदीकाठी उद्यानाची उभारणी केली जाणार आहे, त्यासाठी १४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
2) सोलर एनर्जी प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी २८० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पाण्याच्या पुनर्वापरासाठी ९० कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर झोपडपट्टी सुधारणा, वाहनतळ, ई-गव्हर्नन्स अ‍ॅक्टिव्हिटी तिथे राबविल्या जाणार आहेत. त्याचबरोबर तिथील रस्त्यांचे सुसूत्रीकरण करून पदपथांची संख्या वाढविली जाणार आहे.

Web Title: Dynamic transport, 24 hours water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.