विमानतळावर आता मिळणार ई-बोर्डिंग पास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 02:07 AM2019-02-18T02:07:46+5:302019-02-18T02:08:24+5:30
पुणे विमानतळावरून प्रवाशांची संख्या वाढत आहे. पुढील काही महिन्यांत हा आकडा वार्षिक १ कोटीच्या पुढे जाणार आहे. प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा वाढविण्यासाठीही विमानतळ प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत
पुणे : विमानतळावर प्रवाशांना सुरक्षा कक्ष व बोर्डिंग एरियामध्ये प्रवेशासाठी आता ई-बोर्डिंग पास मिळणार आहेत. दोन्ही ठिकाणी ई-गेट बसविले जाणार असून पासवरील बारकोड स्कॅन केल्यानंतरच या गेटमधून प्रवाशांना प्रवेश मिळेल. प्रायोगिक तत्त्वावर देशात पहिल्यांदा हा प्रयोग पुणे विमानतळावर राबविणार आहे. याबाबत विमानतळ संचालक अजयकुमार यांनी दुजोरा दिला.
पुणे विमानतळावरून प्रवाशांची संख्या वाढत आहे. पुढील काही महिन्यांत हा आकडा वार्षिक १ कोटीच्या पुढे जाणार आहे. प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा वाढविण्यासाठीही विमानतळ प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. याअंतर्गत आता ई-बोर्डिंग पासची चाचणी घेण्यासाठी ‘दि ब्युरो आॅफ सिव्ही एव्हिएशन’ (बीसीएएस)ने मान्यता दिली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील ४५ दिवस चाचणी सुरू राहील. याचा अहवाल ‘बीसीएएस’ला सादर केल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल. बनावट तिकिटाच्या आधारे प्रवास करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी ही यंत्रणा फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला (सीआयएसएफ)वरील ताणही कमी होणार आहे.