पुणे मराठी ग्रंथालयात ई-बुक लायब्ररी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 02:31 AM2018-11-07T02:31:11+5:302018-11-07T02:32:04+5:30
शतकोत्तर सातवा वर्धापन दिन साजरा करत असलेल्या पुणे मराठी ग्रंथालयाने आधुनिकतेची कास धरण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे दोन लाख पुस्तकांचा ठेवा असलेल्या ग्रंथालयाने ई-बुक लायब्ररीच्या दिशेने पावले वळवली आहेत.
- प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे - शतकोत्तर सातवा वर्धापन दिन साजरा करत असलेल्या पुणे मराठी ग्रंथालयाने आधुनिकतेची कास धरण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे दोन लाख पुस्तकांचा ठेवा असलेल्या ग्रंथालयाने ई-बुक लायब्ररीच्या दिशेने पावले वळवली आहेत. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ३००० पुस्तकांच्या स्कॅनिंगला सुरुवात झाली असून ग्रंथालयाचे संकेतस्थळही वेगाने कार्यान्वित होणार आहे.
जुन्या आणि दुर्मिळ पुस्तकांचे जतन व्हावे, पुस्तके सुस्थितीत राहून वाचकांना एका क्लिकमध्ये उपलब्ध व्हावीत, यासाठी ई-बुक ही कालानुुरूप गरज बनली आहे. हा बदल स्वीकारून तंत्रज्ञानाचा सदुपयोग करून पुस्तके ई-बुकच्या रूपात जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावीत, यासाठी पुणे मराठी ग्रंथालयाने ई-बुक लायब्ररीचा निर्णय घेतला आहे. न. चिं. केळकर यांच्या पुढाकारातून पुणे मराठी ग्रंथालयाची स्थापना झाली. सध्या ग्रंथालयात दोन लाखांहून अधिक पुस्तके असून, तीन हजार जुनी, दुर्मिळ पुस्तके वाचण्यास उपलब्ध आहेत. विद्यार्थी, अभ्यासक, सामान्य नागरिक अशा हजारोंच्या संख्येने वाचक नियमितपणे या पुस्तकांचा लाभ घेतात.
ई-बुक लायब्ररी तयार करण्यासाठी सुरुवातीला स्कॅनिंग करून पुस्तके कॉपी करून ठेवली जातात. सध्या ३००० पुस्तकांच्या स्कॅनिंगचे काम सुरू असून, त्याचा दस्तावेज तयार केला जाणार आहे. ग्रंथालयाच्या संकेतस्थळाचे कामही वेगाने सुरू आहे. स्कॅनिंग आणि कॉपी झाल्यावर ही ई-बुक्स गुगल ड्राईव्हवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासाठी एक अर्जही अपलोड करण्यात येणार आहे. वाचकांनी फॉर्म भरल्यावर त्यांना सदस्यत्व क्रमांक आणि पासवर्ड दिला जाईल. हा लॉगिन आणि पासवर्ड वापरून वाचकांना हव्या त्या पुस्तकांचा लाभ घेता येणार आहे. पुस्तक रिन्यू करण्यासाठी १० दिवसांचा कालावधी दिला जाईल. या कालावधीनंतर पुस्तके वाचकांच्या अकाऊंटमधून डीलीट होणार आहेत, अशी माहिती ग्रंथालयाच्या कार्यवाह अनुजा कुलकर्णी यांनी दिली.
पुस्तकांच्या स्कॅनिंगसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो. मात्र, पुणे मराठी ग्रंथालयाला राज्य मराठी विकास संस्थेतर्फे स्कॅनर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या स्कॅनरचे कर्मचाऱ्यांना यथायोग्य प्रशिक्षण दिले जात आहे. पुस्तकांच्या डिजिटायझेशनचेही काम सुरू आहे. पुणे नगर वाचन मंदिरातर्फे पुस्तकांचे मोफत डिजिटायझेशन करून देण्यास सुरुवात झाली आहे. सर्व तांत्रिक बाजूंची पूर्तता झाल्यावर ई-बुक वाचकांना सहजासहजी उपलब्ध व्हावीत, यासाठी अध्यक्ष मुकूंद अनगळ, उपाध्यक्ष दिलीप ठकार, डॉ. सुरेश पळसोटकर, कार्याध्यक्ष धनंजय बर्वे, कार्यवाह अनुजा कुलकर्णी, प्रा. चारुदत्त निकम या कार्यकारी मंडळाने विशेष पुढाकार घेतला आहे.
ग्रंथालयात आधुनिक रॅक
पुणे मराठी ग्रंथालयामध्ये वाचकांना पुस्तके पाहणे, निवडणे, वाचणे सोयीचे व्हावे, यासाठी आधुनिक स्वरूपाच्या रॅक तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.
रॅकला रेल्वेच्या रुळांप्रमाणे स्वरूप देण्यात आले आहे. व्हीलमुळे रॅक हलवणे सोपे झाले असून, पुस्तके कपाटबंद असतील. त्यामुळे पुस्तकांवर धूळ वगैरे बसणार नाही. या रॅकचे काम आठवडाभरात पूर्ण होणार आहे.