पुण्यात लवकरच धावणार ई-बस
By admin | Published: April 16, 2017 04:15 AM2017-04-16T04:15:40+5:302017-04-16T04:15:40+5:30
शहरात लवकरच बॅटरीवर चालणाऱ्या ई-बस सुरू करण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर अशा ३ बस ९० दिवस सुरू करण्यात येतील. याशिवाय, ५०० वातनुकूलित
पुणे : शहरात लवकरच बॅटरीवर चालणाऱ्या ई-बस सुरू करण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर अशा ३ बस ९० दिवस सुरू करण्यात येतील. याशिवाय, ५०० वातनुकूलित बसही खरेदी करण्यात येणार आहेत. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला कंपनीचे अध्यक्ष तथा नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, कार्यकारी संचालक तथा आयुक्त कुणाल कुमार, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, तसेच महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे हे पदसिद्ध संचालक व काँग्रेसचे रवींद्र धंगेकर व शिवसेनेचे संजय भोसले उपस्थित होते. नव्याने पदाधिकारी झालेल्या संचालकांच्या नावाला सुरुवातीला मान्यता घेण्यात आली. काँग्रेसच्या वतीने धंगेकर यांचे नाव देण्यात आले असल्याची माहिती मंडळाला देण्यात आली.
त्यानंतर मागील बैठकीचे इतिवृत्त, कंपनीचे हिशेब आदी विषय घेण्यात आले. ई-बससाठी एकूण १६ कंपन्यांनी प्रस्ताव दिला असल्याची माहिती कुणाल कुमार यांनी दिली. त्यांपैकी ११ कंपन्या या वेळी उपस्थित होत्या. त्यांनी आपण या ई-बस पुरवू शकतो, अशी ग्वाही दिली.
प्रायोगिक तत्त्वावर सलग ३ महिने ३ बस सुरू करून पाहाव्यात व नंतर त्याबाबत निर्णय घ्यावा, असे संचालक मंडळाच्या बैठकीत ठरले. तशी तयारी ३ कंपन्यांनी दर्शविली’ मात्र कंपनीने बॅटरी चार्जिंगसाठी वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
(प्रतिनिधी)
सौरउर्जेचा पर्याय
मुंबई महापालिकेने घेतलेल्या वातानुकूलित बस बंद केल्या आहेत, त्याची कारणे शोधावीत, अशी सूचना चेतन तुपे यांनी केली. बॅटरी चार्जिंगसाठी वीज वापण्याऐवजी सौरऊर्जा वापरता येते, त्याचाही अभ्यास करावा असेही तुपे यांनी सुचविले. कंपन्यांनी त्याला मान्यता देऊन त्याविषयाची माहिती सादर करू, असे सांगितले.
पीएमपीच्या माध्यमातून त्यांना वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला. यासाठी या कंपन्यांनी प्रत्येक बसला १ लाख ५० हजार खर्च प्रतिमहा सांगितला. तो कमी करून १ लाख करण्यात आला. तशी तयारी त्यांनी दाखवली. ३ बससाठीचे ३ लाख रुपये याप्रमाणे ३ महिन्यांचे ९ लाख रुपये पीएमपी खर्च करणार आहे.
या बसचा ३ महिन्यांचा विजेचा खर्चही त्यांनीच स्वतंत्र मीटर बसवून करायचा आहे. या बस कोणत्या मार्गावर ठेवायच्या, याचा निर्णयही पीएमपी व्यवस्थापनानेच घ्यायचा आहे.
- बसचे तिकीट नेहमीप्रमाणेच असेल व मिळणारे सगळे उत्पन्नही पीएमपीलाचा मिळेल, असे ठरविण्यात आले. पीएमपीसाठी ५०० वातानुकूलित बस घेण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला.