Sinhgad Fort: सिंहगडावर ई-बसची चाचणी; अटींची पूर्तता नसल्याने प्रतीक्षा करावी लागणार
By श्रीकिशन काळे | Updated: June 20, 2023 13:45 IST2023-06-20T13:44:44+5:302023-06-20T13:45:02+5:30
किल्ले सिंहगड येथे जाण्यासाठी खासगी वाहनांचा बंदी घालण्याचा निर्णय वन विभागाने घेतला होता...

Sinhgad Fort: सिंहगडावर ई-बसची चाचणी; अटींची पूर्तता नसल्याने प्रतीक्षा करावी लागणार
पुणे : किल्ले सिंहगडावर जाण्यासाठी पुन्हा ई-बस सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी गडावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर गाडीची चाचणी केली. परंतु, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य त्या अटीच्या पूर्तता केल्या नाहीत. त्यामुळे अजून तरी पीएमपी बस चालविण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
किल्ले सिंहगड येथे जाण्यासाठी खासगी वाहनांचा बंदी घालण्याचा निर्णय वन विभागाने घेतला होता. त्यानंतर पायथ्यापासून पीएमपीकडून ई-बस सेवा सुरू करण्यात आली होती. त्यासाठी ई-बस चार्जिंग सुविधाही विकसित केली होती. डोणजे येथे वाहनतळ विकसित करण्यात आले होते. पर्यटकांचाही या सेवेला प्रतिसाद मिळत होता. मात्र अरूंद रस्ता, दरड कोसळण्याच्या घटना, अपुरी चार्जिंग स्थानके आणि अपघातांमुळे ही सेवा काही महिन्यांपूर्वी बंद केली. कारण तिथे बसला वळविण्यासाठी योग्य ते घाटात बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी बदल करा, त्यानंतरच पीएमपी सेवा सुरू करू, असे सांगितले असल्याचे बोलले जात आहे.
याविषयी पाहणी झाल्यानंतर पीएमपी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली आणि पीएमपी अधिकाऱ्यांकडून घाट रस्त्याची पाहणी केली. नव्याने चार्जिंग स्थानके उभारण्यात आल्यानंतर आणि पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्यानंतर ही सेवा सुरू करण्याचे संकेत पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत.