ई-बस नवीन वर्षात धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:47 AM2018-07-25T01:47:04+5:302018-07-25T01:47:30+5:30
आठवडाभरात निविदा प्रक्रिया सुरू होणार
पुणे : इलेक्ट्रिक वातानुकूलित बस घेण्याबाबत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालक मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. पुढील आठवडाभरात ई-बससाठीच्या निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होऊन नवीन वर्षात पुणेकरांना ई-बसमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
केंद्र तसेच राज्य शासनाच्या धोरणानुसार विविध शहरांमधील पर्यावरणाचा गंभीर प्रश्न विचारात घेऊन सार्वजनिक सेवेत ई-बसला प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी पीएमपीच्या ताफ्यात ई-बस आणण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर काही महिन्यांपूर्वी संचालक मंडळाने ५०० बस घेण्याला संमती दिली. त्यानुसार प्राथमिक आराखडा तयार करण्याचे काम भोसरी येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्स्पोर्ट (सीआयआरटी) या संस्थेला देण्यात आले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत ही संस्था पीएमपीची सल्लागार म्हणून काम पाहत आहे. या संस्थेतील अधिकाऱ्यांनी मंगळवारी संचालक मंडळातील सदस्यांसमोर आराखड्याचे प्राथमिक सादरीकरण केले. त्यावर झालेल्या चर्चेनंतर ‘सीआयआरटी’ला अंतिम आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार पुढील आठवडाभरात हा आराखडा तयार होऊन त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यावर चर्चा झाली. या बैठकीला पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पुणे पालिका आयुक्त सौरभ राव, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, ममता गायकवाड, नगरसेवक व संचालक सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते.
शिरोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीमध्ये केवळ ई-बस घेण्याबाबत चर्चा झाली. सीआयआरटीच्या प्रतिनिधींनी त्यावर सादरीकरण केले. त्यानंतर बसची एकूण किंमत, कराराचा कालावधी, पायाभूत सुविधा यांसह विविध मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली. एकूण ५०० बस घेण्यावर संचालक मंडळाने यापूर्वीच होकार दिला आहे. सीआयआरटीने प्राथमिक आराखडा केला असून, आठवडाभरात अंतिम अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आराखडा आल्यानंतर लगेचच निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल. एकूण ५०० बसेसची निविदा एकाच वेळी प्रसिद्ध केली जाईल. परंतु, त्यानंतर १५० व ३५० अशा दोन टप्प्यांत प्रत्यक्ष बस ताफ्यात दाखल होतील. ही प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत चालेल. त्यानंतर जानेवारी महिन्यात किमान २५ बस मार्गावर धावतील, अशापध्दतीने नियोजन केले जाईल.
बस वातानुकूलितच असतील
वातानुकूलित बस परवडणार नाहीत, ही चर्चा चुकीची आहे. डिझेल वातानुकूलित बस व ई-बसच्या खर्चामध्ये मोठी तफावत आहे. ई-बससाठी जास्तीत जास्त ५० रुपये प्रति किलोमीटर भाडे देण्याचे प्रस्तावित आहे. सध्या सीएनजीच्या नॉन एसी बससाठी आपण ५० ते ५२ रुपये मोजत आहोत. तसेच ई-बसचे भाडे आणखी कमी करण्याबाबतही प्रयत्न केला जात आहे. त्यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे शिरोळे यांनी सांगितले.