ई-कॉमर्स, उद्योग सुरू ठेवून टाळेबंदी नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:10 AM2021-04-13T04:10:05+5:302021-04-13T04:10:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : उद्योग, खाद्य पदार्थांचे ठेले, ई-कॉमर्स कंपन्या चालू राहणार. व्यवसायांना मात्र टाळेबंदी लागू राहणार, अशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : उद्योग, खाद्य पदार्थांचे ठेले, ई-कॉमर्स कंपन्या चालू राहणार. व्यवसायांना मात्र टाळेबंदी लागू राहणार, अशी अंशतः टाळेबंदी नको, अशी भूमिका पुणे व्यापारी महासंघाने घेतली.
टाळेबंदी उठविण्यासाठी पुणे व्यापारी महासंघाने असहकाराची भूमिका घेतली. सोमवारपासून (दि १२) सामूहिकरीत्या दुकाने उघडण्यात येतील अशी घोषणा महासंघाने केली होती. पुणे व्यापारी महासंघाशी सोने, कपडे, लाकूड व्यापारी, इलेक्ट्रॉनिक, खेळणे अशा ऐंशीहून अधिक संघटना संलग्न आहेत. या असहकार आंदोलनाची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी रविवारी सायंकाळी बैठक बोलावली होती. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया, प्रकाश ओसवाल, राहुल हजारे, मनोज सारडा, नितीन पोरवाल, यशस्वी पटेल, राज मुछाल उपस्थित होते.
विभागीय आयुक्त राव यांनी व्यापारी प्रतिनिधींना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे शहरातील कोरोनास्थितीची माहिती दिली. दुकाने उघडल्यास ग्राहकांच्या माध्यमातून कोरोनाचा वेगाने प्रसार होईल, असे सांगितले. तसेच १५ ते २० एप्रिल या कालावधीत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान दोन दिवस अथवा मुख्यमंत्र्यांचा निर्णय येईपर्यंत दुकाने न उघडण्याचे आवाहन केले.
दुकाने बंद असतानाही कोरोना रुग्णसंख्या वाढतच आहे. उद्योग, खाद्यपदार्थ ठेले, रिक्षा, ई कॉमर्स सुरू आहे. केवळ व्यावसायिकांसाठी टाळेबंदी आम्ही मान्य करणार नाही. संपूर्ण टाळेबंदीस आमचा पाठिंबा आहे.
--
व्यापारी संघटनांत दुकाने उघडण्यावरून मतभेद
विभागीय आयुक्तांनी बोलावलेली बैठक रविवारी रात्री नऊ वाजता संपली. त्या नंतर व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. ही बैठक रात्री एक पर्यंत चालली. त्यात इलेक्ट्रॉनिक, युज कार, खेळणी विक्रेते, प्लायवूड आणि टिम्बर असोसिएशन, प्रिंटिंग अशा नऊ संघटनांनी दुकाने उघडू नये अशी भूमिका घेतली. तीस संघटनांनी दुकाने उघडावी असे मत मांडले.