Double Decker Bus: पुणेकरांसाठी लवकरच धावणार इ- डबलडेकर बस; प्रति किलोमीटरला ६ रुपये
By भाग्यश्री गिलडा | Updated: July 24, 2024 16:21 IST2024-07-24T16:20:41+5:302024-07-24T16:21:18+5:30
‘पीएमपीएमएल’च्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या ठरावानुसार पुणे शहरासाठी २० डबल डेकर बसेसला मंजुरी देण्यात आली

Double Decker Bus: पुणेकरांसाठी लवकरच धावणार इ- डबलडेकर बस; प्रति किलोमीटरला ६ रुपये
पुणे : पुणेकरांचा प्रवास आणखी सुलभ आणि सोयीचा करण्यासाठी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 'डबल डेकर' बसेस दाखल होणार आहेत. ‘पीएमपीएमएल’च्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीमध्ये झालेल्या ठरावानुसार पुणे शहरासाठी २० डबल डेकर बसेसला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी दिली. ही बस इलेक्ट्रिक व वातानुकूलित असल्याने पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.
पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी डिसेंबर २०२२ मध्ये 'डबलडेकर' बस खरेदीचा निर्णय घेतला. त्याला संचालक मंडळाची मंजुरी देखील मिळाली होती. आता पीएमपी प्रशासनाकडून पुढील आठवड्यापासून याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. मात्र बस खरेदीचा निर्णय ते खरेदीची निविदा प्रक्रिया यासाठीच दीड वर्ष लोटला. बस प्रत्यक्षात धावण्यासाठीदेखील किमान सहा महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
कशी असेल नवी डबलडेकर बस ?
- पूर्वीच्या डबल डेकर बसला केवळ एकच जिना होता. नव्या बसला दोन जिने असणार आहेत. तसेच नवीन डबल डेकर बस ही इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित असेल.
- बसमध्ये अधिक चांगल्या प्रतीच्या सस्पेन्शनच्या वापरामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायक होणार आहे. यासोबतच नव्या बसेसमध्ये डिजिटल तिकिट काढता येणार आहे. नव्या बसचा लुक लंडनमध्ये धावणाऱ्या डबलडेकर बससारखा असणार आहे.
- डबल डेकर बसमध्ये प्रवासी क्षमता ही सीटिंग ७० पर्यंत असेल तर उभे राहून ४० प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.
- या डबल डेकर बसची किंमत २ कोटी रुपये असून उंची १४ फूट ४ इंच असल्याने मेट्रोच्या स्थानकाचाही अडसर होणार नाही. पूर्वी 'पीएमपी'च्या ताफ्यात 'एसएलएफ' प्रकारची डबल डेकर बस होती. त्याच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च जास्त होता. नवी बस इलेक्ट्रिक असल्याने त्याच्या देखभालीचा खर्च अत्यल्प असणार आहे.
प्रति किमीसाठी सहा रुपये
'इलेक्ट्रिक बस'साठी प्रति एक किलोमीटर धावण्यासाठी ६ रुपये खर्च येतो. मात्र ठेकेदाराच्या बसला प्रति किमीसाठी ५० ते ६० रुपये द्यावे लागते. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने स्वतः मालकीच्या बस खरेदीचा निर्णय घेतला आहे. यासाठी 'पीएमपी' प्रशासन बँकेकडून कर्ज घेणार असल्याचे कळते आहे. शिवाय पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका व पीएमआरडीए यांच्याकडून आर्थिक साहाय्यदेखील घेणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ई-बसच्या यशानंतर ई-डबर डेकर
२०१८ साली पीएमपीएमएलच्या ताफ्यात पहिली ई-बस धावली होती. या वातानुकूलित ई-बसला चांगला प्रतिसाद मिळून रोज लाखो पुणेकर या बसेसमधून प्रवास करतात. त्यानुसार चार्जिंग स्टेशनचीही संख्या वाढवण्यात आली आहे. आता डबल वाहतूक क्षमतेसाठी 'पीएमपीएमएल'च्या ताफ्यात डबल डेकर बसचे संचलन होणार आहे.
पुण्यामध्ये आयटी कंपन्या असल्याने पुणे व पिंपरी- चिंचवड शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊन प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी महामंडळाने हा प्रस्ताव मांडला होता. येत्या काळात आणखी इलेक्ट्रिक तसेच सीएनजी बसेस महामंडळाच्या ताफ्यात आणून शहरातील नागरिकांनी स्वतःच्या दोन आणि चारचाकी वाहनांचा वापर करू नये हा महामंडळाचा उद्देश आहे. पीएमपीने स्वमालकीच्या २० डबलडेकर बस घेण्याचा निर्णय घेतला आहे.- नितीन नार्वेकर, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल.