वानवडीत साकारणार ‘ई-ग्रंथालय’, महिलांसाठी संगणक प्रशिक्षण उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 02:18 AM2018-08-25T02:18:11+5:302018-08-25T02:18:47+5:30
परिसरात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत असून यूपीएससी, एमपीएससी, लॉ, पीएचडी, उच्चशिक्षण घेत असणाऱ्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना व वाचकप्रेमींसाठी पुस्तकरूपी भांडार म्हणून वानवडीमध्ये ई-ग्रंथालय लवकरच सुरू होणार आहे.
वानवडी : परिसरात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत असून यूपीएससी, एमपीएससी, लॉ, पीएचडी, उच्चशिक्षण घेत असणाऱ्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना व वाचकप्रेमींसाठी पुस्तकरूपी भांडार म्हणून वानवडीमध्ये ई-ग्रंथालय लवकरच सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दृष्टीने तसेच वाचनाची आवड असणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी ग्रंथालयाच्या आवश्यकतेची दखल घेत तसेच महिलांना संगणकीय प्रशिक्षण सुरू करण्याकरिता या भागातील नगरसेवक धनराज घोगरे यांनी महात्मा फुले सांस्कृतिक भवनाच्या आवारातील हॉलमध्ये 'ई-ग्रंथालय' सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
वानडीमधील महात्मा फुले सांस्कृतिक भवनमध्ये पहिल्या मजल्यावर चार छोटे हॉल व दुसऱ्या मजल्यावर दोन मोठे हॉल असून, ही इमारत मालमत्ता विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे कै. सावित्रीबाई शिवरकर बहुउद्देशीय हॉल येथील पहिल्या मजल्यावरील ७५० स्क्वे.फू.चे दोन छोटे हॉल या उपक्रमासाठी उपलब्ध करून देण्याबाबत ठरावाचे पत्र नगरसचिव कार्यालयात देण्यात आले आहे, असेही घोगरे यांनी सांगितले.
स्मार्ट पुण्यात सर्व क्षेत्र हळूहळू डिजिटल होत असताना वानवडीतील विद्यार्थी व वाचकप्रेमींना पुस्तकरूपी भांडार म्हणून ई-लायब्ररी सुरू करण्यात येणार असून, एका क्लिकवर पुस्तक वाचायला मिळणार आहे; तसेच महिलांसाठी संगणकीय प्रशिक्षण देण्याचा उपक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
- धनराज घोगरे, नगरसेवक