पुण्यात वैद्यकीय अन अंत्यसंस्कारासाठीच मिळतोय 'ई पास'; आत्तापर्यंत तब्बल ६० हजार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 02:34 PM2021-05-04T14:34:39+5:302021-05-04T14:35:11+5:30
शहरातील शहरात जाण्यासाठीही करताहेत अर्ज : एका दिवसात होतो मंजूर.....
पुणे : राज्य शासनाने लॉकडाऊन करुन संचारबंदी जाहीर केल्याने अत्यावश्यक कारणासाठी जिल्ह्याबाहेर जाणार्यांसाठी डिजिटल पासची व्यवस्था केली आहे. मात्र, त्यात प्रामुख्याने वैद्यकीय कारण व जवळच्या नातेवाईकांच्या निधन या दोन प्रमुख कारणासाठी सध्या ई पास दिला जात आहे. विशेष म्हणजे पाससाठी अर्ज केल्यानंतर अर्जाच्या संख्येनुसार तो २४ तासाच्या आत मंजूर होतो.
तब्बल ६० हजार अर्ज
ई पास सेवा सुरु केल्यानंतर पुणे शहर पोलीस आयुक्तालयात आतापर्यंत तब्बल ५९ हजार ५७७ अर्ज सोमवारी सायंकाळपर्यंत आले होते.
पुणे पोलिसांनी आतापर्यंत १६ हजार ७९२ जणांना डिजिटल पास वितरित केला आहे. त्याचवेळी ३१ हजार ७९० अर्ज नामंजूर करुन ते फेटाळण्यात आले
आहेत.
ही दिली जातात प्रमुख कारणे
या संचारबंदीत केवळ अत्यावश्यक व महत्वाच्या कारणासाठी प्रवासाला मंजुरी देण्यात येणार आहे. त्यामुळे मी अडकून पडलो आहे. लांबच्या नातेवाईकांचे निधन झाले आहे. याशिवाय अत्यावश्यक नसलेली कारणे असल्यास ई पास दिला जात नाही.
ई पाससाठी असा करावा अर्ज
पोलिसांनी एक वेबसाईटचा पत्ता दिला आहे. त्यावरील अर्ज भरावा़ त्यात प्रामुख्याने प्रवासाचे कारण काय, कधी, कोठे, कोणत्या गाडीने जाणार याची आवश्यक ती माहिती भरावी. तसेच त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे उदा. कोविड चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट, आधारकार्ड व ज्या कारणासाठी प्रवास करायचा आहे. त्याची पुष्टी देणारी कागदपत्रे जोडावीत.
जिल्ह्याबाहेर जायचे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे ई पास आवश्यक आहे. जिल्ह्याच्या शहराच्या सीमेवर तुम्हाला अडविल्यास व तेथे तुमच्याकडे ई पास नसल्यास तेथून तुम्हाला परत माघारी पाठविले जाऊ शकते.
शहरातल्या शहरात अत्यावश्यक कामासाठी ई पासची आवश्यकता नाही. मात्र, घराबाहेर पडण्यासाठी तुमच्याकडे योग्य व पटेल असे कारण हवे. अनेक जण शहरातल्या शहरात जाण्यासाठी ई पासासाठी अर्ज करतात. तसेच काही जण अत्यावश्यक सेवेत मोडत असतानाही वाहतूकीसाठी अर्ज करतात. अशाचे अर्ज फेटाळण्यात येतात.
किती वेळात मिळतो पास
प्रवासासाठी नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज आल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सेवा प्रकल्पात २४ तास कर्मचार्याची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्ज आल्यावर तेथील कर्मचारी अर्जाचे कारण पाहतात. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जोडलेली आहेत का. ज्यांनी अर्ज केला, त्यांचेच आधारकार्ड आहे का. कोविड चाचणीचे निगेटिव्ह रिपोर्ट सोबत जोडला आहे का, याची तपासणी करतात. कारण योग्य वाटल्यास अर्ज मंजूर केला जातो. हे काम काही मिनिटांमध्ये पूर्ण होते. मात्र अनेकदा अर्जांची संख्या खूप असते. त्यामुळे प्रलंबित अर्जांची संख्या अधिक असेल तर साधारण २४ तासात अर्जावर निर्णय होतो.
..........
शहर पोलीस दलाने सेवा प्रकल्पात ई पास देण्याची स्वतंत्र सोय केली आहे. अर्जासोबत कोविड टेस्टचा रिपोर्ट असला तरच प्रामुख्याने डिजिटल पास दिले जात आहेत. त्यामुळे अर्जासोबत कोविड टेस्टचा रिपोर्ट अत्यावश्यक आहे.
श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.