पारदर्शकतेसाठी ई-तिकीट
By admin | Published: April 4, 2015 05:57 AM2015-04-04T05:57:27+5:302015-04-04T05:57:27+5:30
पीएमपीएमएल’ बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशास वाहकाने दिलेल्या तिकिटाची त्वरित नोंद होऊन ती माहिती सर्व्हरद्वारे कार्यालयास उपलब्ध होणार आहे.
मंगेश पांडे, पिंपरी
‘पीएमपीएमएल’ बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशास वाहकाने दिलेल्या तिकिटाची त्वरित नोंद होऊन ती माहिती सर्व्हरद्वारे कार्यालयास उपलब्ध होणार आहे. या ‘आॅनलाईन ई-तिकिटिंग’ प्रक्रियेमुळे तिकिटाच्या पैशांचा गैरव्यवहार रोखला जाणार असून, पारदर्शक कारभारासाठी ‘ई-तिकिटिंग’ यंत्रणा उपयुक्त ठरेल.
सध्या प्रत्येक क्षेत्रात आॅनलाइन कामकाजावर भर दिला जात आहे. अशीच प्रक्रिया ‘पीएमपीएमएल’ बसमधील ‘ई-तिकिटिंग’ यंत्रणेसाठीही सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. काही दिवसांपूर्वी ही प्रक्रिया सुरू केली. मात्र, ही सेवा ‘आॅफलाईन’ होती. आता हीच सेवा आॅनलाईन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीचे कामकाज पीएमपीकडून सुरू आहे.
वाहकाकडे असलेल्या यंत्रात मोबाईल सिमकार्डप्रमाणे चीप असेल. ही चीप सॅटलाईटशी कनेक्ट असेल. या यंत्रावर तिकीट काढल्यास काही क्षणातच त्याबाबतची माहिती कार्यालयात समजणार आहे. दर तीस सेकंदाला यंत्रावरील ‘अपडेट’ कार्यालयात कळणार आहेत.
सध्या कागदी तिकिटांच्या माध्यमातून जमा केलेल्या रकमेचा भरणा करताना वेळ वाया जातो. तिकिटाप्रमाणे वाहकाला हिशेब द्यावा लागतो. यामध्ये अनेकदा घोळही होतात. आता ई-तिकिटिंग यंत्र आल्यास रकमेचा भरणा करण्यासाठी वाहक आगारात पोहोचण्यापूर्वीच संबंधित वाहकाने जमा करावयाची रक्कम त्याला कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याकडून समजणार आहे. यामुळे वेळेची तर बचत होणारच, शिवाय हिशेबही तंतोतंत राहण्यास मदत होणार आहे.
यापूर्वी वाहकांना आॅफलाईन यंत्रे देण्यात आली होती. या यंत्राद्वारे दिवसभरात वाहकाने दिलेल्या तिकिटांची माहिती रात्री कार्यालयात जमा केली जात होती. यामध्ये गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आल्याने ही यंत्रे बंद करण्यात आली. आता पुन्हा आॅनलाईन ‘ई-तिकिटिंग’ सुविधा सुरू करण्याचे ‘पीएमपी’कडून नियोजित आहे. या यंत्रणेमुळे कामकाजात गतिमानता येण्यास मदत होणार आहे. यंत्राद्वारे मिळणाऱ्या तिकिटावर मार्ग, प्रवास भाडे, तिकीट दिल्याची वेळ आदी माहिती नमूद असेल. या प्रकल्पासाठी यंत्राची चाचणी काही दिवसांपूर्वीच घेण्यात आली. निगडी ते अप्पर इंदिरानगर डेपो आणि मार्केट यार्ड ते घोटावडे या मार्गावर ही चाचणी घेण्यात आली. यामध्ये घोटोवडे मार्गावरील काही ठिकाणी रेंज मिळण्यास अडचण आली. मात्र, इतर ठिकाणी ही चाचणी यशस्वी झाली. या चाचणीचा अहवाल लवकरच संचालक मंडळासमोर सादर करण्यात येणार असून, त्यास मान्यता मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल अशी माहिती वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली.