पुणे शहरात सुरू होणार ई-टॉयलेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 03:55 PM2018-04-25T15:55:51+5:302018-04-25T15:55:51+5:30
महिलांसाठी प्रत्येकी २ सीटस असलेली १२ व पुरूषांसाठी प्रत्येकी १ सीट असलेली २ अशी एकूण १४ टॉयलेट शहरातील १४ ठिकाणी बसवण्यात येणार आहेत.
पुणे: खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीमधून शहरात १४ ठिकाणी अत्याधुनिक ई-टॉयलेट बसवण्यास स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या सभेत मान्यता देण्यात आली. यासाठी दोन कोटी रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
खासदार शिरोळे यांनीच हा प्रस्ताव महापालिकेला दिला होता. ही टॉयलेट विद्युत शक्तीवर चालणारी आहेत. स्टेनलेस स्टिलची तयार करण्यात आली आहे. त्यात कॉईन टाकली की त्याचे दार खुले होईल. त्याच्या वापरानंतर ती आपोआप स्वच्छ होतील. बाहेर आले की दार बंद होईल. पुन्हा कॉईन टाकल्याशिवाय दरवाजा खुला होणार नाही. वीज, पाणी यांचा वापर कमीतकमी होतो, त्यामुळे ही टॉयलेट फायदेशीर ठरणार आहेत असे स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक व नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले. शौचालय तसेच फक्त स्वच्छतागृह अशा दोन्हीसाठी याचा वापर करता येईल. महिलांसाठी प्रत्येकी २ सीटस असलेली १२ व पुरूषांसाठी प्रत्येकी १ सीट असलेली २ अशी एकूण १४ टॉयलेट शहरातील १४ ठिकाणी बसवण्यात येणार आहेत. त्याची देखभालदुरूस्ती कंपनीकडून पहिले वर्ष विनामुल्य करण्यात येणार आहे. त्यानंतर कंपनीला त्यासाठी महापालिकेला शुल्क अदा करावे लागेल. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, मॉडेल कॉलनी, हिरवाई उद्यान, भैरोबा नाला, गोखलेनगर, रामोशी वस्ती, कामगार पुतळा, कर्वेनगर, मावळे वस्ती, दांडेकर पुल वसाहत आदी ठिकाणी ही शौचालये ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुळीक यांनी दिली.