यापूर्वी ऑडी दुभाजकावर धडकवण्याचा अग्रवाल कुटुंबातील कार्ट्याचा प्रताप; नोंद नाही, मात्र सगळीकडे चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 10:03 AM2024-05-22T10:03:32+5:302024-05-22T10:04:21+5:30

याआधीही याच कुटुंबातील मुलाने अशाच प्रकारे ऑडी ही आलिशान गाडी दुभाजकावर चढवण्याचा प्रकार केला असल्याची चर्चा आहे....

Earlier, the feat of the Agarwal family to hit the Audi divider; Not recorded, but discussed everywhere | यापूर्वी ऑडी दुभाजकावर धडकवण्याचा अग्रवाल कुटुंबातील कार्ट्याचा प्रताप; नोंद नाही, मात्र सगळीकडे चर्चा

यापूर्वी ऑडी दुभाजकावर धडकवण्याचा अग्रवाल कुटुंबातील कार्ट्याचा प्रताप; नोंद नाही, मात्र सगळीकडे चर्चा

पुणे : पोर्शे गाडीच्या धडकेने दोन तरुण अभियंत्यांचे बळी घेतल्याचे प्रकरण ताजे आहे; पण याआधीही याच कुटुंबातील मुलाने अशाच प्रकारे ऑडी ही आलिशान गाडी दुभाजकावर चढवण्याचा प्रकार केला असल्याची चर्चा आहे.

बड्या बापांची बिघडलेली मुले मोकळ्या रस्त्यांवर तुफान वेगात गाडी चालवण्याचा खेळ अनेक रात्री करत असतात. दिवसा या गाड्या रस्त्यावरच्या वाहतुकीमुळे त्यांच्या मूळ वेगात वापरता येत नाहीत. त्यामुळेच मध्यरात्रीची वेळ निवडून मोकळ्या रस्त्यावर हा वेगाचा खेळ खेळण्याचा प्रकार या बिघडलेल्या मुलांकडून नियमित होत असतो. पैशांची प्रचंड मोठी ताकद असल्याने पोलिस व प्रशासन त्यांच्या या दुसऱ्यांसाठी जीवघेण्या असलेल्या खेळाकडे दुर्लक्ष करतात. अपघात झाला, तरीही त्याची नोंद करण्याऐवजी प्रकरण मिटवून टाकण्याचाच प्रयत्न करतात.

साधारण ५ वर्षांपूर्वी ऑडी गाडीची क्रेझ होती. त्यावेळी अशाच एका रात्री कल्याणीनगर परिसरातील एका दुभाजकावर मध्यरात्रीच्या सुमारास एक ऑडी चढली. ती चालवणारा गाडी चालवतानाच स्नॅप शॉट घेण्याचा प्रयत्न करत होता. तो याच कुटुंबातील असल्याचे या परिसरातील रहिवासी सांगतात. या सर्व गाड्यांची अंतर्गत रचना गाडी चालवणाऱ्यासाठी प्रचंड सुरक्षित असते. त्यामुळे अपघातात गाडी पलटी झाली, तरी ती चालवणाऱ्याला काही होत नाही, मात्र गाडीखाली आलेल्यांची जीव हमखास जातात. या अपघातात सुदैवाने कोणी ठार झाले नाही किंवा जखमीही झाले नाही. बीआरटीमध्ये झालेल्या या अपघाताची बीआरटीकडेच कसली नोंद नाही.

आमदार टिंगरे अग्रवाल यांच्याकडे नोकरीस होते!

दरम्यान, अपघात झाल्यानंतर मध्यरात्री तीन वाजता घरून उठून थेट पोलिस ठाण्यात धडकलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्याकडे नोकरीला होते. खुद्द टिंगरे यांनीच ही माहिती दिली. अग्रवाल कुटुंब व आपले कुटुंब यांचा मागील २५ ते ३० वर्षांपासून घरोबा आहे. त्यांचे वडील व माझे वडील यांची मैत्री होती. त्यामुळे अभियंता म्हणून पास आऊट झाल्यानंतर मी सुमारे वर्षभर त्यांच्याकडे नोकरीस होतो, अशी माहिती टिंगरे यांनी दिली.

त्या रात्री अग्रवाल यांचाच नाही, तर अन्य कोणाचाही फोन आला असता, तरी मी तिथे लोकप्रतिनिधीची जबाबदारी म्हणून गेलोच असतो. मी तिथे कोणतेही गैरकाम केले नाही. कायद्यानुसार जी काही कार्यवाही असेल ती करा, असेच मी तेथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले. राजकीय हेतूने मला या प्रकारात विनाकारण बदनाम केले जात आहे.

- सुनील टिंगरे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Earlier, the feat of the Agarwal family to hit the Audi divider; Not recorded, but discussed everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.