पुणेकर गारठले! शहरावर पहाटे धुक्याची दुलई, किमान तापमानात घट

By श्रीकिशन काळे | Published: December 8, 2023 10:04 AM2023-12-08T10:04:07+5:302023-12-08T10:06:10+5:30

हवेत गारठा असल्याने पुणेच गारठून गेल्याचा अनुभव पहायला मिळाला...

Early morning mist over the city, minimum temperature drop pune latest news | पुणेकर गारठले! शहरावर पहाटे धुक्याची दुलई, किमान तापमानात घट

पुणेकर गारठले! शहरावर पहाटे धुक्याची दुलई, किमान तापमानात घट

पुणे : यंदा कडाक्याच्या थंडीचा अनुभव आज (दि.८) पुणेकर घेत आहेत‌. पहाटे शहरावर धुक्याची दुलई पहायला मिळाली. हवेतील आर्द्रता ९८ टक्के असल्याने रस्त्यावरील दृष्यमानताही कमी झाल्याचे पहायला मिळाले. हवेत गारठा असल्याने पुणेच गारठून गेल्याचा अनुभव पहायला मिळाला.

गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये हळूहळू वाढ होताना दिसत होती. गेल्या आठवड्यात सकाळी गारठा असला तरी दुपारी मात्र उकाडा जाणवत होता. आता मात्र सकाळी आणि दिवसभर देखील गारवा अनुभवायला मिळत आहे. आज सकाळी तर सर्वत्र धुके धुके झाले होते.

धुके हे एक दृश्य ढगासमान असते, ज्यात पाण्याचे अथवा बर्फाचे सुक्ष्म बिंदू असतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा त्याजवळ हे हवेत लटकलेले असतात. त्यास एक निम्न पातळीवर असणारा एक प्रकारचा ढग असेही म्हणता येते. 
आज थंडीची लाट आली आहे का ? अशी चर्चा आहे. परंतु थंडीची लाट येते तेव्हा किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खूप खाली जाते. ९ ते ११ जानेवारी २०१७ दरम्यान पुण्यात थंडीची लाट आली होती. तेव्हा पुण्याचे किमान तापमान ७ अंश सेल्सिअस पर्यंत आले होते. आता हवेली, हडपसर, मगरपट्टा, पाषाण, एनडीए या परिसरातील किमान तापमान १३ अंश सेल्सिअसच्या जवळ आहे. त्यामुळे थंडीचा कडाका जाणवत आहे. 

आजपासून कडाक्याच्या थंडीला सुरवात होण्याची शक्यता जाणवते आहे. अरबी समुद्रातील तीव्रतेत जाऊन महाराष्ट्र भू-भागावर वळणारे कमी दाब क्षेत्र पश्चिमेकडे सरकून समुद्रातच विरळण्याच्या शक्यतेमुळे सोमवार दि.११ डिसेंबर ते बुधवार दि.१३ डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील अपेक्षित किरकोळ पावसाची शक्यताही आता मावळली आहे. उत्तर भारतात सध्या एकापाठोपाठ प्रवेशणारे पश्चिमी झंजावात, त्यातून पडणारा पाऊस व बर्फबारीमुळे तेथील सकाळची दृश्यता खालावली असून तेथे थंड वातावरण व धुके जाणवत आहे.

- माणिकराव खुळे, माजी हवामानतज्ज्ञ

Web Title: Early morning mist over the city, minimum temperature drop pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.