कामातून नाव कमवा आणि मग निवडणूक लढवा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 09:17 PM2019-07-30T21:17:25+5:302019-07-30T21:23:06+5:30
“तरुणांना राजकारणाकडे वळावेसे वाटणे ही खरोखर आनंदाची बाब आहे. परंतु राजकारणात येणे म्हणजे निवडणूक लढविणे एवढेच लक्ष्य ठेवू नये. उलट आपले आवडीचे क्षेत्र निवडून त्यात अगदी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून काम करायला हवे''.
पुणे : “तरुणांना राजकारणाकडे वळावेसे वाटणे ही खरोखर आनंदाची बाब आहे. परंतु राजकारणात येणे म्हणजे निवडणूक लढविणे एवढेच लक्ष्य ठेवू नये. उलट आपले आवडीचे क्षेत्र निवडून त्यात अगदी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून काम करायला हवे. आपले मतदार फार सुज्ञ आहेत. ते आपल्या पाठीशी असलेल्या नावापेक्षा कामाला अधिक महत्व देतात. त्यामुळे आपल्या कामातून नाव कमवा आणि मग निवडणूक लढवा.” असे मार्गदर्शन शिवसेनेच्या युवसेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी तरुणांना केले.
‘आंत्रप्रिनीयर्स ऑर्गनायझेशन’ (ईओ) च्या ‘ईओ पुणे’ शाखेने पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील हाॅटेल जे डब्लू मॅरिएट या ठिकाणी मागील आठवड्यात आदित्य ठाकरे यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन केले होते त्यावेळेला ठाकरे बोलत होते. या मुलाखतीत पुणे शाखेचे बोर्ड सदस्य अक्षय आढळराव पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी ‘ईओ पुणे’ शाखेचे अध्यक्ष मानव घुवालेवाला, संवाद विभागाचे प्रमुख विशाल वोहरा, बोर्ड सदस्य अक्षय आढळराव पाटील, तेजपाल रांका व आदित्य पिट्टी याबरोबरच उद्योग, आयटी अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ठाकरे यांनी राजकारणातील प्रत्यक्ष सहभाग ते आंतरराष्ट्रीय राजकारण, भविष्यातील योजना अशा विविध विषयांवर या वेळी दिलखुलास चर्चा केली.
या वेळी युवकांना प्रोत्साहन देत ठाकरे म्हणाले, “कोणत्याही क्षेत्रात तुम्ही वारशाच्या भरवशावर फार काळ टिकू शकत नाहीत. तुमचे कामच ग्राह्य धरले जाते. त्यामुळे आवडीचे क्षेत्र निवडा म्हणजे त्यात तुम्ही जास्त काळ काम करू शकाल. राजकारणात घराणेशाही चालते असे जरी म्हणत असले तरी तुमच्या कामाशिवाय जनताही तुम्हाला निवडून देत नाही. मतदार फार सुजाण असतात. त्यांचा प्रतिसाद लगेच मिळतो. काम नसेल तर लोक लगेच नाकारतात. जेंव्हा आपण लोकांपर्यंत पोहोचतो तेंव्हा कामाचे खरे स्वरूप व आवाका आपल्याला समजतो. नाहीतर बऱ्याच योजना फक्त कागदावर असतात प्रत्यक्षात नाही.”
पक्षाचे काम व आव्हानांविषयी बोलताना ते म्हणाले, “स्वसंरक्षण, पर्यावरण सुरक्षा, २४/७ चालणारे रेस्टॉरंटस् हे सगळे नवे मुद्दे आमच्या पक्षाने हाती घेतले आहेत, ते एक आव्हान आहे. कारण वरकर्णी हे मुद्दे फक्त शहरी दिसत असले तरी यासोबत अनेक गरीब, ग्रामीण लोकांची पोटे आणि कुटुंब यांना जोडली गेलेली आहेत. जर शहराला जागतिक दर्जा मिळवून द्यायचा असेल तर आपल्या विचारांच्या आणि नियम-कायद्यांच्या कक्षा रुंदावणे गरजेचे आहे. ज्यावेळी १९९७ मध्ये मुंबई महापालिका शिवसेनेकडे आली तेंव्हा महापालिका आधीच ५०० कोटींच्या तोट्यात होती. आज मात्र महापालिका ‘सरप्लस’ आहे. मुंबई कोस्टल भागात ९ हजार कोटीचा निधी खर्चून महापालिका स्वबळावर रस्ता बनवत आहे. जिथे राज्याकडे पैसा नाही त्याच राज्यातील महापालिका स्वबळावर एवढा मोठा प्रकल्प राबवत आहे याचा आम्हाला अभिमान आहे.” जर पुण्याने आम्हाला येथेही संधी दिली तर या भागातही आम्ही असेच चांगले काम करू इच्छितो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.