जॉबपेक्षा ऑनलाइन गेम खेळून घरबसल्या पैसे मिळवणं कधीही चांगलेच; तरुणाईचे परखड मत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 09:48 AM2023-01-09T09:48:48+5:302023-01-09T09:49:02+5:30
मैदानावर खेळून घाम गाळण्यापेक्षा तरुणाईला ऑनलाइन गेम खेळण्याची क्रेझ
मानसी जोशी
पुणे : सतत गेम्स खेळल्याने अनेक ट्रिक्स लक्षात येतात. यातून क्रिएटिव्हिटीदेखील वाढू शकते, ९ ते ५ जॉबपेक्षा ऑनलाइन गेम खेळून घरबसल्या पैसे मिळवणं कधीही चांगलेच.अशी परखड मत नव्या पिढीच्या तरुणाईने व्यक्त केली आहेत.
तंत्रज्ञानाने जग जवळ आणले. तसेच खेळाडूंनाही मैदानावरून मोबाइलवर आणलेले दिसत आहे. मैदानावर खेळून घाम गाळण्यापेक्षा घरात एसीमध्ये बसून ऑनलाइन गेम खेळण्याची क्रेझ तरुणाईमध्ये दिसत आहे. पबजीसारख्या ऑनलाइन खेळावर बंदी घातली असली तर त्याच्याऐवजी कितीतरी नवे गेम उदयाला आले असून, त्यांच्या आता ऑनलाइम टुर्नामेंटदेखील भरत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमतने काही तरुणांशी संवाद साधला.
एकही क्षेत्र आता असे राहिलेले नाही ज्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही. तरुणाईला तर जणू उपजतच हे ज्ञान असल्यासारखी स्थिती आहे. मोबाइल त्यांचा जीव की प्राण झाला आहे. याच मोबाइलवर ई-स्पोर्ट्सचे असंख्य प्रकार उपलब्ध झाले असून, तरुणाईला त्याने वेड लावले आहे. फ्री फायर, गॉड ऑफ वॉर, माईनक्राफ्ट अशा नावांच्या या ऑनलाइन खेळांमध्ये बंदुकांची खोटी मारामारी, त्यावर मिळणारे गुण, त्याची स्पर्धा असे सगळे काही आहे. त्यासाठी गरज असते ती फक्त एका जागेवर बसून मोबाइल ऑपरेट करण्याची. सतत मोबाइलमध्ये डोके खुपसून बसण्याची.
असा रंगताे खेळ
अनेक गेम्स सध्या प्ले स्टोअरवर तरुणाईसाठी उपलब्ध आहेत. तिथून ते आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घेतात. यातील काही गेम्स तर अशा आहेत की, ज्याची क्रिकेट टुर्नामेंटसारखी टुर्नामेंट होते. काही गेम्समध्ये रीतसर कॉमेंट्री केली जाते. जी व्यक्ती अथवा ग्रुप जिंकेल त्याला बक्षिसे दिली जातात, म्हणजे त्यांच्या खात्यात पैसे जमा होतात.
सहभागासाठीही पैसे
टुर्नामेंट्स असतील तर त्यात सहभागासाठी फक्त भारतातूनच नाही तर जगभरातूनही खेळाडू सहभागी होतात. सहभाग म्हणजे प्रत्यक्ष येणे नाही तर मोबाइलवरच रजिस्ट्रेशन करून मोबाइलवरच खेळाडू म्हणून त्या गेममध्ये सहभागी होणे. त्याची आता अनेक खेळाडूंना सवय झाली आहे. त्यांची नावेही या क्षेत्रात प्रसिद्ध झाली आहेत. ते खेळात असतील तर खेळात मजा येते, त्यामुळे त्यांना सहभागासाठीही पैसे दिले जातात.
घरबसल्या कमाई
काही प्रसिद्ध गेमर्सनी यूट्युबवर स्वतःचे गेमिंग चॅनेल काढले आहेत. जे गेमर लाइव्ह येऊन खेळत असतात. त्यांचे फॅन्स त्यांना आपल्या मर्जीप्रमाणे पैसे देतात. ग्रॅनी-३, मिस्टर मीट, चु चु चार्ल्स या अशा काही गेम्स आहेत. ज्या यूट्युबला लाइव्ह येऊन मनोरंजक पद्धतीने खेळल्या जातात. हे गेम खेळणाऱ्यांना पैसे मिळतात. अनेकांनी आता हा कमाईचा घरबसल्या वेगळाच मार्ग सुरू केला आहे.
''अरे काय ते २४ तास मोबाइल पाहत बसलेला असतो. याने काय तुझे भले होणार आहे' असे घरचे किती वेळा बोलतात. याच मोबाइलने घरबसल्या पैसे मिळत आहेत. ९ ते ५ जॉबपेक्षा ऑनलाइन गेम खेळून घरबसल्या पैसे मिळवणं कधीही चांगलेच. समतोल ठेवून गेम खेळला गेला तर गेमर म्हणून यात करिअर होऊ शकते.- केदार स्वामी, महाविद्यालयीन तरुण''
''सतत गेम्स खेळल्याने अनेक ट्रिक्स लक्षात येतात. यातून क्रिएटिव्हिटीदेखील वाढू शकते. किती आणि कोणत्या प्रकाराने एखादी गोष्ट आपण करू शकतो हे समजते. याचा नाद लागतो हे खरे आहे, मात्र ते आपल्यावर आहे. अति तिथे माती असे असतेच. त्यामुळे मनोरंजन म्हणून पाहणे गरजेचे आहे. - प्रणव जोशी, महाविद्यालयीन तरुण''
''सुरुवातीला अनेक मुले पबजी खेळत होते. त्यांच्या अकाउंटमधून पैसे कट होऊ लागले तेव्हा त्यावर बॅन आणला. आता जे गेम खेळले जात आहेत ते लीगल आहेत. यामध्येही पैसे कट होण्याचे प्रकार घडले तर आम्ही परत योग्य ती कारवाई करू. सध्या तरी अशी कोणतीही तक्रार आमच्यापर्यंत आलेली नाही.- मीनल पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल''