कमावत्या पत्नीही मागू लागल्याहेत पोटगी; पतीच्या संपत्तीवर येऊ शकते टाच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 12:49 AM2018-12-30T00:49:45+5:302018-12-30T00:50:03+5:30
घटस्फोट झाल्यानंतर पत्नीला दैनंदिन खर्च व मुलांच्या शिक्षणांसाठी पतीकडे पोटगी मागण्याचा अधिकार आहे. पत्नी कमावती नसल्याने तिची व मुलांची हेळसांड होऊ नये, हा त्यामागील उद्देश.
- सनील गाडेकर
पुणे : घटस्फोट झाल्यानंतर पत्नीला दैनंदिन खर्च व मुलांच्या शिक्षणांसाठी पतीकडे पोटगी मागण्याचा अधिकार आहे. पत्नी कमावती नसल्याने तिची व मुलांची हेळसांड होऊ नये, हा त्यामागील उद्देश. मात्र पत्नी कमावती असूनदेखील ती पोटगी मिळण्यासाठी पत्नीला न्यायालयात खेचत आहे. तसेच आपल्या उत्पन्नाचा स्रोत न्यायालयापासून लपवत असल्याचे अनेक प्रकार सध्या घडत आहेत.
स्वत:चा व मुले असतील तर त्यांचा खर्च भागेल एवढे पैसे ती कमावत असतानाही काही पत्नी या पतीच्या पैशावर डोळा ठेवत त्याच्याकडे पोटगीची मागणी करीत आहेत. हे सर्व करीत असताना ती आपण कसे परावलंबी आहोत, हे न्यायालयाल पटवून देताना खोटी माहिती सांगत असल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे परिस्थिती नसतानाही पतीला पत्नीस पोटगी द्यावी लागत आहे. पतीची आर्थिक कोंडी करायची, असाही त्यामागे उद्देश असल्याचे वकील सांगतात, तर काही प्रकरणांमध्ये पत्नी कमावती असतानाही त्यांना पोटगी मिळते. स्वावलंबी नसलेल्या व्यक्तीसाठी वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत पोटगी मागण्याची तरतूद आहे. हिंदू विवाह कायदा, हिंदू दत्तक आणि पोटगी कायदा हे विशेष कायदे तर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १२५ या विशेष कायद्यांमध्ये पोटगीच्या तरतुदी दिलेल्या आहेत. या कायद्याअंतर्गत पोटगी मंजूर करताना न्यायाधीशांनी पतीची सांपत्तिक स्थिती कशी आहे व तिच्या गरजा काय आहेत, या बाबी लक्षात घ्यायला हव्यात.
पतीच्या संपत्तीवर येऊ शकते टाच
वेळेत व ठरलेली पोटगी मिळत नाही, म्हणून पत्नीने अर्ज केल्यास न्यायालय पतीच्या नावावर असलेल्या वस्तू विकून पोटगी देते, तर पतीच्या नावावर काही मालमत्ता नसेल, पण तो नोकरदार असेल तर पत्नीचे खाते पतीच्या खात्याला जोडण्यात येते. पतीचा पगार झाल्यानंतर पोटगीची रक्कम आपोआपच पत्नीच्या खात्यावर जमा होते. या दोन्ही बाबी करूनही पत्नीला दिलासा मिळत नसेल तर पतीविरोधात अटक वॉरंटदेखील बजाविण्यात येऊ शकते.