चिंचवडमध्ये राजकीय भूकंप?
By Admin | Published: September 14, 2016 12:45 AM2016-09-14T00:45:49+5:302016-09-14T00:45:49+5:30
महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, त्या निमित्ताने चिंचवडमध्ये राजकीय भूकंप होण्याचे अंदाज वर्तविले जात आहेत.
चिंचवड : महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, त्या निमित्ताने चिंचवडमध्ये राजकीय भूकंप होण्याचे अंदाज वर्तविले जात आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपाने वेगवान हलचाली सुरू केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. येत्या काही दिवसांत चिंचवडमध्ये सर्वच पक्षांना भूकंपाचे धक्के बसणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
चिंचवडकर शहरातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून चिंचवडमधील ताकद वाढविण्यात भाजपाला यश मिळत आहे. शिवसेनेच्या माध्यमातून खासदार श्रीरंग बारणे यांच्याही हालचाली सुरू आहेत.
प्रभाग पद्धतीमुळे काँग्रेस व मनसेला मात्र
उमेदवार मिळणेही कठीण होणार आहे. काँग्रेसमधील गटबाजी व मनसेची सध्याची परिस्थिती पाहता
त्यांना निवडणुकीसाठी मोठी कसरत करावी
लागणार आहे.
भोईरांना आवतन; कोऱ्हाळेंची द्विधा स्थिती
भोईर यांच्यासाठी विविध पक्षांचे दरवाजे उघडे आहेत. मात्र, ते नेमकी काय भूमिका घेताहेत, हे महत्त्वाचे ठरणार आहे. मुरब्बी असूनही विधान परिषदेला ते मागे पडले. पुन्हा तीच स्थिती ओढवू नये या दृष्टीने त्यांची व्यूहरचना असेल, अशी चर्चा आहे. आमदार जगताप यांनी चिंचवडमध्ये भाजपाची ताकद वाढविली असल्याने त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी ताकदवान नेत्याच्या शोधात आहे. भोईर यांच्या रूपाने ही ताकद उभी करता येईल का, या दृष्टीने अजित पवार चाचपणी करत आहेत.
अनंत कोऱ्हाळे यांच्या माध्यमातून मनसेला चिंचवडमधून एक नगरसेवक मिळाला असला, तरीही पक्षाची ताकद वाढलेली दिसत नाही. त्यामुळे कोऱ्हाळेंचीसुद्धा द्विधा मन:स्थिती झाली आहे.