पुणे जिल्ह्यात जाणवले भुकंपाचे धक्के; प्रशासनाकडून गावांना भेट, ग्रामस्थांची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 10:54 AM2023-08-24T10:54:05+5:302023-08-24T10:55:02+5:30
स्थानिक तहसीलदारांनी धक्का जाणवलेल्या गावांना भेट देऊन लोकांशी चर्चा केली....
घोडेगाव (पुणे) : घोडेगाव व परिसरात पहाटे साडेचार वाजता व दिवसभरात दोनवेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या धक्क्यांनी गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन लोक रस्त्यावर येऊन थांबले होते; मात्र कुठेही नुकसान झाल्याची बातमी नाही. स्थानिक तहसीलदारांनी धक्का जाणवलेल्या गावांना भेट देऊन लोकांशी चर्चा केली.
पहाटे झोपत हे धक्के जाणवल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पासरले. याबाबत राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना अनेक ग्रामसथांनी कळविले. त्यांनी तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांना गावांना भेटी देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार चिंचोली गावात ग्रामस्थांची बैठक घेऊन जाणवलेल्या धक्क्यांची माहिती लोकांकडून समजून घेतली.
यावेळी तहसीलदार नागटिळक यांनी सांगितले की, पहाटे जाणवलेल्या धक्क्यांबाबत पुणे वेधशाळेत चैकशी केली असता त्यांच्याकडे नोंद नाही. आंबेगाव तालुक्यात जाणवलेल्या धक्क्यांची तीव्रता कमी असली तरी वेधशाळेशी संपर्क साधून याचा अभ्यास केला जाईल. भूकंपाचे धक्के ही नैसर्गिक आपत्ती आहे, यामध्ये कोणाचे काही नुकसान झाले असल्यास प्रशासनाला कळवा, लोकांना घाबरून जाऊ नका, असे सांगितले.
घोडेगाव व परिसरात जाणवलेल्या धक्क्यांमुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. लागेल ती मदत केली जाईल. तसेच डिंभे येथे धरणाजवळ भूकंप मापक केंद्र आहे; मात्र येथे लाइट नसल्याने व यातील मशिन जुने झाल्याने हे बंद पडले आहे. येथे नवीन मशिन बसवून हे केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून दिला जाईल व येथे पुन्हा नव्याने भूकंप मापक यंत्रणा सुरू केली जाईल, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. तसेच त्यांनी तहसीलदार नागटिळक यांना या धक्क्यांची माहिती घेऊन अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या.