पूर्व भागात चारा डेपो व टँकर सुरू करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:59 PM2018-11-14T22:59:52+5:302018-11-14T23:00:13+5:30
लोणी धामणी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नऊ गावांमध्ये या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने तीव्र दुष्काळ पडला आहे. त्यामुळे ...
लोणी धामणी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नऊ गावांमध्ये या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने तीव्र दुष्काळ पडला आहे. त्यामुळे टँकर व चारा डेपो सुरू करावेत, आदी मागण्यांचे निवेदन या भागातील नागरिकांनी सोमवारी आंबेगाव/जुन्नर विभागाचे उपविभागीय अधिकारी अजित देशमुख यांना दिले.
आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज यांच्या नेतृत्वाखाली लोणीच्या सरपंच ऊर्मिला धुमाळ, अशोक आदक पाटील, बाळशीराम वाळुंज, सचिन जाधव, संतोष कुरुकुटे, पहाडदऱ्याचे उपसरपंच पोपट वाघ, रामनळ्याचे उपसरपंच राजेंद्र सिनलकर, मनोज तांबे, भीमाजी आदक, गणपत सिनलकर यांनी उपविभागीय अधिकारी अजित देशमुख यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी बोलताना अनिल वाळुंज म्हणाले, की यावर्षी तालुक्याच्या पूर्व भागात लोणी, धामणी, शिरदाळे, पहाडदरा, वडगावपीर, मांदळेवाडी, वाळुंजनगर, रानमळा व खडकवाडी परिसरात तीव्र दुष्काळ पडला आहे. विहिरी, बंधारे, पाझर तलाव कोरडे पडले आहेत.
शेतातील पिके जळू लागली आहेत. त्यामुळे डिंभा उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणीपुरवठा करावा, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावेत, जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावेत, यावर्षी दोन्ही हंगामातील पिके वाया गेल्याने शेतीसाठी घेतलेली कर्जे माफ करावीत, कृषिपंपाची वीजबिले माफ करावीत, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, रोजगार हमीची कामे सुरू करून रोजदारांस प्रतिदिन ५०० रुपये मजुरी द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्या त्वरित मंजूर कराव्यात, अन्यथा राष्ट्रवादीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
शासनाने आंबेगाव तालुक्याला मध्यम स्वरुपाच्या दुष्काळाच्या यादीत घेतले आहे. त्यामुळे टँकरच्या मागणीचे प्रस्ताव आल्यानंतर ते त्वरित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले जातील. मांदळेवाडीचा टँकरचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठवला आहे. चारा डेपोबाबत शासनाच्या कोणत्याच सूचना अद्याप प्राप्त नाहीत. तरीही चारा मागणीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येतील. शासननिर्णयानुसार दुष्काळी तालुका म्हणून सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
-अजित देशमुख,
उपविभागीय अधिकारी