पूर्व हवेली परिसर : तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 02:03 AM2018-04-16T02:03:43+5:302018-04-16T02:03:43+5:30
पूर्व हवेली परिसरात सध्या वाढत्या शहरीकरणाबरोबरच तरुणांचा गुन्हेगारीकडे कल वाढत आहे. याकडे पुणे ग्रामीण पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे.
कदमवाकवस्ती - पूर्व हवेली परिसरात सध्या वाढत्या शहरीकरणाबरोबरच तरुणांचा गुन्हेगारीकडे कल वाढत आहे. याकडे पुणे ग्रामीण पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे.
ऐन तारुण्यात घडलेल्या काही प्रकारामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. तरुणाईला योग्य दिशा मिळत नसल्याने ती गुन्हेगारीच्या विळख्यात अधिकच गुरफटू लागली आहे; मात्र काही तरुण पैसे, दादागिरी, वर्चस्वाचा वाद, राजकारणातून मारामारी, भाऊबंदकी, चैनीसाठी चोऱ्या आणि हातात कमी वयात आलेला पैसा यामुळे गुन्हेगारीकडे वळलेत.
हे गुन्हे त्यांच्याकडून जाणीवपूर्वक झालेत. अटक केलेले तरुण चैनीसाठी गुन्हा केल्याचे कबूल करतात. जिल्ह्यात गुन्हेगारीमध्ये तरुणांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. चोरी, मारामारी आदी गंभीर गुन्ह्याबरोबर अनेक अल्पवयीन पैशांसाठी चोरी केल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्यांमध्ये १८ ते २५ वयोगटांतील तरुणांचा सहभाग वाढत असल्याने समाजव्यवस्थेला ही बाब धक्कादायक आहे.
किरकोळ कारणारवरून तरुण मुले चाकू, सुरे, तलवारी घेऊन बाहेर पडतात. लहान वयातच त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांचे आयुष्य बरबाद होते. पासपोर्ट मिळण्यापासून शासकीय नोकरी मिळण्यापर्यंत त्यांना अडचणी येतात. आईवडिलांच्या दुर्लक्षामुळे ही मुले गुन्हेगारीत अडकतात असे यावेळी लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितले.
- महाविद्यालयीन शिक्षण घेणारे तरुण अगदी परिपक्व नसतात. या वयात घडलेल्या गुन्ह्याचा आयुष्यभर परिणाम होऊ शकतो. याची जाणीव त्यांना होत नाही.
- अटक केल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात होते. तुरुंगात राहिल्यामुळे तेथे त्यांची अन्य सराईत गुन्हेगारांबरोबर ओळख होते. तेथे अशा मुलांचे मार्गच बदलून जातात.
- तुरुंगात गेल्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा ढासळल्यामुळे समाजात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.
- सध्या गुन्हेगारी क्षेत्रात वर्चस्व बसवण्यासाठी १६ ते २५ या वयोगटांतील मुलांमध्ये भाईगिरी ची हवा डोक्यात आहे, यामधून जे गुन्हे घडत आहेत त्यातून त्या मुलांचे भवितव्य उद्ध्वस्त होत आहेत.
- प्रत्येक सरकारी किंवा खासगी नोकरीसाठी पोलीस व्हेरिफिकेशन गरजेचे आहे. जर असे गुन्हे मुलांवर दाखल झाले तर त्याचे भविष्य उद्ध्वस्त होईल.
- त्यासाठी पालकांनी आपल्या
मुलाकडे लक्ष दिले पाहिजे;अन्यथा दहशत माजविण्याचा प्रयत्न
केल्यास अशा संबंधित मुलांवर
तडीपारी किंवा मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येईल.