जिल्ह्याचा पूर्व भाग अद्याप कोरडाच!
By admin | Published: July 24, 2015 04:01 AM2015-07-24T04:01:13+5:302015-07-24T04:01:13+5:30
जूनची सरासरी ओलांडून गायब झालेला पाऊस गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू आहे. मात्र पूर्व भागाकडे त्याने अद्यापही डोळे वटारले आहेत
पुणे : जूनची सरासरी ओलांडून गायब झालेला पाऊस गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू आहे. मात्र पूर्व भागाकडे त्याने अद्यापही डोळे वटारले आहेत. बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड तालुुक्यांत वाट पाहणाऱ्या बळीराजाला तो हुलकावणी देत असून, अद्याप हा भाग कोरडाच राहिला आहे.
५ जूनला जिल्ह्यात
मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. दोन दिवस दमदार पाऊस झाल्यानंतर त्याने विश्रांती घेतली.
त्यानंतर महाराष्ट्रात मॉन्सून
दाखल झाला. मात्र, तो म्हणावा
तसा बरसला नाही. मात्र २५ जूननंतर तीन दिवस जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावत जूनची सरासरी ओलांडली. २२७.९३ मिलिमीटर पाऊस झाला.
जूनच्या शेवटच्या दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा गायब झाला. साधरण २0 दिवस जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा उन्हाळा अनुभवला. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते.
मात्र गेल्या तीन-चार दिवसांपसून पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार मि.मी. पाऊस झाला. त्यात सर्वाधिक मावळ तालुक्यात २५४ मि.मी., त्यानंतर मुळशीत २0७, भोरमध्ये १६६, जुन्नरमध्ये १0७, वेल्हे तालुक्यात १0३, खेडमध्ये ६६.७३ मिलिमीटर पाऊस झाला. मात्र त्याने बारामती, इंदापूर, पुरंदर व दौंड तालुक्यांकडे डोळे वटारले आहेत. बारामतीत पुनरागमनानंतर
फक्त 0.५0 , दौंडमध्ये ८.८७, इंदापुरात 0.८७, पुरंदरमध्ये ८.५७ व शिरूरमध्ये ६.७१ इतकाच पाऊस झाला आहे. त्यामुळे येथील बळराजा चिंतेत असून, पिण्याच्या पाण्यासाठीही त्याची पुन्हा वणवण सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात टँकरची संख्या कमी होऊन १८ वर आली होती. आता पुन्हा त्यात १ टँकर वाढला आहे, तो बारामती तालुक्यात. (प्रतिनिधी)