अटी शिथिल झाल्याने दाखले मिळणे सोपे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 01:36 AM2018-12-21T01:36:52+5:302018-12-21T01:37:11+5:30
सुरेश गोरे : रोहकलला २१० जातीच्या दाखल्यांचे वाटप
आंबेठाण : आदिवासी समाजाला जातीचे दाखले मिळण्यासाठी जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात, अशी विधानसभेत लक्षवेधी मागणी केली होती. त्यानंतर हा प्रस्ताव मान्य होऊन हा एक ऐतिहासिक निर्णय झाल्याप्रमाणे खेड तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजाला याचा लाभ होणार आहे, असे प्रतिपादन आमदार सुरेश गोरे यांनी केले.
रोहकल येथील आदिवासी समाजातील लोकांना २१० जातीच्या दाखल्यांचे वाटप आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र गावडे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, सरपंच अमृत ठोंबरे, उपसरपंच ताई खंडागळे, मंडलअधिकारी बाळकृष्ण साळुंके, तलाठी के. जी. शेख, ग्रामसेविका डावरे, पांडुरंग गोरे, श्रीनाथ लांडे, दशरथ कचोळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि आदिवासी ठाकर समाजाचे नागरिक उपस्थित होते. आमदार गोरे म्हणाले, विकासकामे करण्याबरोबर वैयक्तिक लाभ मिळाला तर तो खरा सर्वसामान्य जनतेचा विकास आहे. सध्या जिल्ह्यात फक्त खेड तालुक्यात असे दाखले मोठ्या प्रमाणात दिले जात आहे. तसेच गायरानासह शासकीय जागेत बांधलेली घरे लवकरच नागरिकांच्या नावावर होणार आहे. त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. आदिवासी समाज पूर्वी शिक्षण नसल्याने जातीचे दाखले काढण्यासाठी जाचक अटी होत्या. त्यामुळे त्यांना पुरावे देता येत नसल्याने जातीचे दाखले मिळण्यात अडचणी येत असल्याने जातीच्या दाखल्यामुळे शासनाच्या अनेक योजनांचा लाभ त्यांना मिळण्यात अडचणी येत होत्या. मात्र शासनाने जाचक अटी शिथिल केल्याने जातीचे दाखले मिळून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल.