भेकराईनगर आगारातील विकासकामांचे खा. सुळे यांच्या हस्ते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:14 AM2021-08-22T04:14:53+5:302021-08-22T04:14:53+5:30
पुणे : पीएमपीएमएलच्या भेकराईनगर आगारात अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, प्रवाशांच्या सोयीसाठी सुसज्ज बस स्थानक, पास केंद्र, वाहतूक नियंत्रण कक्ष ...
पुणे : पीएमपीएमएलच्या भेकराईनगर आगारात अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, प्रवाशांच्या सोयीसाठी सुसज्ज बस स्थानक, पास केंद्र, वाहतूक नियंत्रण कक्ष व डेपोच्या आवारात वृक्षारोपण अशा सव्वा दोन कोटी रुपयांच्या विकासकामांचे उदघाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. नगरसेवक गणेश ढोरे यांच्या निधीतून ही कामे मार्गी लागली.
या वेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात घरी बसून पगार घेतला नाही, तर कोरोना प्रतिबंधासाठी नेमून दिलेली जोखमीची व जबाबदारीची कर्तव्ये चोखपणे बजावली. त्याबद्दल पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.
पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे म्हणाले की, पीएमपीएमएलचा भेकराईनगर डेपो हा आशिया खंडातील सर्वांत पहिला आणि सर्वांत मोठा ई-बस डेपो ठरला आहे, ही निश्चितच आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. भेकराईनगर आगारातून जेजुरी, रांजणगाव एमआयडीसी, यवत, निगडी, हिंजवडी इ. ठिकाणी स्मार्ट एसी ई-बसेसद्वारे संचलन सुरू आहे. येत्या काही दिवसांत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ई-बस डेपो उभारले जाणार आहेत.
नगरसेवक गणेश ढोरे म्हणाले की, दोन वर्षांपासून पालिकेतून जास्तीत जास्त निधी आणून विकासकामे सुरू आहेत. भेकराईनगर आगार दगडखाण होती, त्या ठिकाणी अधिकारी-कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळी, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, जि.प. सदस्या अर्चना कामठे, पीएमपीचे कामगार व जनता संपर्क अधिकारी सतीश गाटे, भेकराईनगर आगार व्यवस्थापक दीपक वाळुंजकर उपस्थित होते.