इंदापूर दौऱ्यात खा. सुप्रिया सुळे यांच्या वाहनाला घेराव; तरुणांनी दिले निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 07:49 PM2024-02-23T19:49:00+5:302024-02-23T19:50:02+5:30
मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष व आ. दत्तात्रय भरणे यांचे कट्टर समर्थक राहुल गुंडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा घेराव घातला....
इंदापूर : खा. सुप्रिया सुळे यांच्या गुरुवारच्या इंदापूर दौऱ्यात युवकांनी त्यांच्या वाहनास घेराव घालून त्यांच्याकडे, गरिबांसाठी मल्टीस्पेशालिटी तर महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय, तरुण पिढीसाठी रोजगाराबरोबर अद्ययावत वाचनालय, बालकांसाठी बालोद्यान उभारण्याची मागणी केली.
मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष व आ. दत्तात्रय भरणे यांचे कट्टर समर्थक राहुल गुंडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा घेराव घातला. खा. सुळे यांनी गुंडेकर यांना त्यांच्या वाहनामध्ये बसवून, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. बालोद्यानची मागणी तत्काळ पूर्ण करण्यात येईल. येणाऱ्या काळात इतर मागण्याही पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन खा. सुळे यांनी दिले. खा. सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. आम्ही त्यांचे मतदार आहोत. त्यामुळे हक्काने त्यांच्यापुढे आम्ही आमच्या मागण्या मांडल्या आहेत, असे गुंडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
इंदापूर हे पुणे जिल्ह्यातील सोलापूर, नगर, उस्मानाबाद जिल्ह्यांना जोडणारे तालुक्याचे ठिकाण आहे. त्या जिल्ह्याच्या सीमांवरच्या गावातील लोक लहान मोठ्या आजारांवरील उपचारासाठी इंदापूरला येतात. गंभीर आजारांवरील उपचारासाठी त्यांना येथून अकलूज, बारामती, पुणे, सोलापूर या ठिकाणी जावे लागते. बिकट आर्थिक परिस्थितीतील लोकांना बाहेरचे उपचार परवडत नाहीत. त्यामुळे त्यांना उपचार करण्यास परवडेल, असा मल्टीस्पेशालिटी दवाखाना इंदापुरातच उभारावा. महिलांसाठीही सुसज्ज असा स्वतंत्र दवाखाना असावा. तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी शहर किंवा परिसरात व्यवस्था व्हावी. शासकीय योजनेतून किंवा आपल्या पुढाकारातून तरुणांसाठी अद्ययावत वाचनालय उभा करावे. बालकांसाठी बालोद्यान निर्माण करावे. शासकीय योजना अथवा संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी परगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभा करावे. वृध्दांना व्यायामासाठी छोटी क्रीडांगणे असावीत, अशा मागण्या खा. सुप्रिया सुळे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.