रानभाज्या खा अन‌् निरोगी राहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:13 AM2021-08-12T04:13:55+5:302021-08-12T04:13:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना महामारीमुळे पौष्टिक व आरोग्यदायक आहाराचे महत्त्व खूपच वाढले असून, लोक आपल्या पूर्वपार ...

Eat legumes and stay healthy! | रानभाज्या खा अन‌् निरोगी राहा !

रानभाज्या खा अन‌् निरोगी राहा !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना महामारीमुळे पौष्टिक व आरोग्यदायक आहाराचे महत्त्व खूपच वाढले असून, लोक आपल्या पूर्वपार व पारंपरिक जीवनशैलीकडे वळू लागले आहेत. याचमुळे सध्या शहरी लोकांकडून श्रावणात मुबलक प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या पौष्टिक, रुचकर आणि आरोग्यदायक रानभाज्यांची मागणी वाढताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या निसर्गरम्य तालुक्यांत रानभाज्या उपलब्ध होत आहेत.

सह्याद्रीच्या घाटात दर वर्षी पावसाळ्यात विविध रानभाज्या उगवतात. पावसाळी हवामानात वाढणाऱ्या या भाज्या अतिशय दुर्मिळ, पौष्टिक औषधी व चविष्ट असतात. रानभाज्यांविषयी अनेकांना कुतूहल व खाण्याची उत्सुकता असते. मात्र, या भाज्यांची माहिती नसल्यामुळे या सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने खायला मिळत नाहीत.

पाऊस पडला की रानात, शेताच्या बांधावर, माळरानावर, झुडपांमध्ये या रानभाज्या उगवतात. यामध्ये कंद, हिरव्याभाज्या, फुलभाज्या, फळभाज्या, शेंगभाज्या, बियांपासून तयार होणाऱ्या भाज्या अशा भाज्या रांगांमध्ये विविध प्रकारच्या आहेत. सह्याद्रीच्या राहणाऱ्या आदिवासींना याची चांगली माहिती असते. हे लोक अजूनही रानात फिरून या भाज्या गोळा करतात आणि खातात. यामुळे त्यांच्या आरोग्याला फायदा होतोच, याहीपेक्षा निसर्गाशी त्यांची नाळ जुळून राहते. काही ठिकाणी डोंगराळ भागात राहणारे लोक या भाज्या गोळा करतात आणि जवळच्या बाजारपेठेत विकायला आणतात. रानभाज्या मधुमेह, पोटदुखी, खोकला, वात आदी आजारांवर उपयुक्त आहेत.

याचबरोबर कंद वर्गातील हाळिंद, खरबुडी तर फळ वर्गातील रानकेळी, मिकी, रानतोंडली पालेभाज्यांमध्ये कोळू आघाड्याची पाने, तेरा, तांदुळजा, फांदी, शेवाळे, हादगा, रानभेंडी, बांबूचे कोवळे कोंब, भोपळ्याची कोवळी फुले यांच्यादेखील भाज्या केल्या जातात.

---------

म्हैसवेलाची पाने : वेलवर्गातील या भाजीच्या पानांची भाजी केली जाते. म्हशीच्या तोंडासारखा पानांचा आकार असल्याने त्याला म्हैसवेलाची पाने म्हणतात. अळूच्या वड्या जशा बनवल्या जातात, तशाच या पानांच्या वड्या करून खाल्ल्या जातात किंवा सुकी भाजीदेखील बनवली जाते.

-----

चाव्याचा बार :

चाव्याच्या वेलाला नंतर फुले येतात. या फुलांची भाजी बनवली जाते. छोट्या अंड्यांप्रमाणे ही फुले असतात. हिरवी मिरची व कांद्यामध्ये परतून याची भाजी केली जाते. ही भाजी अतिशय औषधी असून स्वादिष्ट लागते.

------

चिचारडी : पित्तावर अतिशय गुणकारी असणारी ही भाजी अतिशय कडवट असते. चिचारडीचे झाड काटेरी असते. झुडपांमध्ये ही झाडे उगवतात. चिचारडी काढताना खूप काटे टोचतात. चिचुरडी ठेवून, पाण्यात उकळून पिळून घेऊन मग भाजी केली जाते.

-----

कवदर : डोंगराच्या कातळ दगडामध्ये रानकेळी उगवतात. या रानकेळींवर सुरुवातीला येणाऱ्या कोवळ्या कॅगाला कवदर म्हणतात. या कोवळ्या केंगामधील कोंबडा काढून टाकावा लागतो व नंतर त्याची भाजी केली जाते. याची भाजी अतिशय स्वादिष्ट लागते.

------

रुखाळू : अळूच्या पानांसारखे असणारे रुखाळू उंबर, आंबा, सागाच्या झाडांवर खोडामध्ये उगवतात. नुसते पान खाल्ले तर तोंडात प्रचंड चुणचुण होते. यासाठी चिंचगुळामध्ये ही भाजी बनवली जाते.

------

भारिंग : भारिंग याच्या फुलांची व कोवळ्या पानांची केली जाते. साधारण कडवट लागणारी ही भाजी कांदा-लसूण टाकून परतून केली जाते.

------

चाव्याचे कवळे : कांब पाऊस पडल्याबरोबर चाव्याचे वेल उगवतात. या उगवलेल्या वेलाचे कोवळे कोंब तोडून त्याची भाजी केली जाते. हे कॉब कांद्याच्या पातीसारखे कापून त्यांची भाजी बनवली जाते.

------

करटुली : वेलाला येणारी करटुली करल्यासारखी काटेरी असतात. राज्यात सर्वत्र पावसाळ्यात ही भाजी आढळून येते. याची भाजी कारल्यासारखीच मसाला लावून रस्सा अथवा कोरडी बनवतात. मधुमेह व रक्ताशी निगडित आजार असल्यास ही भाजी खाल्ली जाते.

-----

करंद : ही भाजी कंद वर्गातील असून रताळे, बटाट्यासारखी असते. याचा कंद लाल रंगाचा असतो. ही भाजी उपवासाला खाल्ली जाते व बनवण्याची पटतदेखील बटाट्याच्या तसेच रताळ्याच्या सारखीच आहे. दम्यासाठी ही भाजी गुणकारी मानली जाते.

-----

Web Title: Eat legumes and stay healthy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.