पुणे: भरपूर खा आरोग्यदायी पालेभाज्या; मेथी, पालक १० रुपयांना जुडी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 11:24 AM2021-11-29T11:24:09+5:302021-11-29T11:27:07+5:30
पुणे: मार्केट यार्डात कोथिंबीर, मेथी आणि पालकाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे या पाले भाज्यांचे दर उतरले आहेत. ...
पुणे:मार्केट यार्डात कोथिंबीर, मेथी आणि पालकाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे या पालेभाज्यांचे दर उतरले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी अवकाळी पावसाच्या परिणामामुळे कोथिंबीर जुडी किरकोळ बाजारात अगदी ५०-६० रुपयांपासून ८० ते १०० रुपयांपर्यंत गेली होती. मात्र, आता आवक वाढत आहे. त्यामुळे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत.
बाजारात रविवारी कोथिंबीरची १ लाख २५ हजार तर मेथीची ४० हजार जुड्यांची आवक झाली आहे. नोव्हेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्यापासून पालेभाज्यांची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. मागील महिन्यात पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले होते. मेथी, कोथिंबीरची जुडी ६० ते ८० रुपयांपलीकडे गेले होते. पालेभाज्या यामुळे आहारातून हद्दपार झाल्या होत्या. मात्र, आता दर बऱ्यापैकी आवाक्यात आले आहेत. मेथीची जुडी १० ते १५ रुपये तर, कोथिंबीरची जुडी १० ते १५ रुपये, पालक ८ ते १०, शेपू ८ ते १० आणि करडईची जुडी ८ ते १० रुपयांना मिळत आहे.
काय आहेत पालेभाज्यांचे दर
पालेभाज्या मार्केट यार्डातील दर-किरकोळ बाजारातील दर
कोथिंबीर : ३ ते ६ - १० ते १५
मेथी : ५ ते ७ - १० ते १५
पालक : ५ ते ८ - ८ ते १०
शेपू : ७ ते ८ - ८ ते १०
करडई : ६ ते ८ - ८ ते १०
चवळई : ५ ते ६ - १० ते १२
म्हणून पालेभाज्या झाल्या स्वस्त
पालेभाज्या खा, आरोग्य जपा-
हवामान बदलले की लगेच सर्दी, खोकला, ताप असे आजार येतो. दोन्ही वेळेच्या जेवणात किमान अर्धी वाटी पालेभाजी खाणे आरोग्यास लाभदायक आहे. लोह आणि कॅल्शियम असल्यामुळे पालक रक्तवाढीला आणि हाडे बळकट व्हायला उपयुक्त आहे. पोट वारंवार बिघडल्यास पालक गुणकारी आहे. तर मधुमेही व्यक्तीसाठी मेथी उपयुक्त आहे. भूक आणि अन्नपचन सुधारते, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.
मार्केट यार्डात आवक वाढल्याने मेथी, कोथिंबीर, शेपू आणि पालक या पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. हिरव्या पालेभाज्यांचे दर कमी झाल्याने गृहिणींची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.
- अमोल घुले, व्यापारी