शहरातील तलावांना प्रदूषणाचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 03:55 AM2018-07-28T03:55:17+5:302018-07-28T03:55:47+5:30
सांडपाणी, कचऱ्यामुळे तलावातील जीवसृष्टी धोक्यात; डबक्यात होईल रूपांतर
पुणे : पुण्याची ओळख व शहराच्या सौंदर्यामध्ये भर टाकणाºया शहरातील कात्रज अप्पर तलाव, स्व. राजीव गांधी प्राणिसंग्रहालय येथील तलाव आणि पाषाण तलाव प्रचंड प्रमाणात वाढलेला कचरा व सांडपाण्यामुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत. यामुळे तलावातील जीवसृष्टी व येथे येणाºया पक्ष्यांचे जीवनच धोक्यात आल्याचे महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालात स्पष्ट केले आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर या तलावांचे सांडपाण्याच्या डबक्यांमध्ये रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही.
कात्रज परिसराच्या आजूबाजूच्या टेकड्यांवरून वाहत येणारे पावसाचे पाणी पेशवेकालीन तलावामध्ये साचते. स्व. राजीव गांधी प्राणिसंग्रहालय येथील एकूण ३० एकर क्षेत्र असलेल्या लोअर तलाव व त्याच्या दक्षिणेस एकूण १४ एकर क्षेत्र असलेला अप्पर तलाव अशा दोन स्तरांवर कात्रज तलाव विभागला गेला आहे.
अप्पर तलावातील पाणी लोअर तलावामध्ये सोडले जाते. तर पाषाण तलावाकडे देखील पुण्याच्या वैभवामध्ये भर टाकणारा तलाव म्हणून पाहिले जात असून, येथे हिवाळ्यामध्ये देश-विदेशातून स्थलांतरण करणारे अनेक पक्षी दरवर्षी येतात. ही पुणेकरांसाठी एक मोठी पर्वणी असते. परंतु गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलेल्या शहरीकरणामुळे व वाढत्या लोकसंख्येमुळे या तलावांचे अस्तित्वच धोक्यात आले.
कात्रजच्या दोन्ही तलावांमध्ये आजूबाजूच्या परिसरातून येणाºया पाण्यात प्रचंड प्रमाणात सांडपाणीमिश्रित पाणी येते. तसेच या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात कचरादेखील तलावामध्ये येण्याचे प्रमाण वाढले आहे.
‘डीओ’चे प्रमाण घटले
पाषाण तलावामध्येदेखील हीच परिस्थिती आहे. यामुळे या तिन्ही तलावांमध्ये प्राणवायू म्हणून ओळखल्या जाणाºया पाण्यात विरघळणारा आॅक्सिजनचे (डीओ) प्रमाण गेल्या दोन वर्षांत झपाट्याने कमी होत असल्याचे पर्यावरण अहवालात स्पष्ट केले आहे. तर पाण्यातील रासायनिक पदार्थांच्या प्रदूषणाचा मापदंड म्हणून सीओडीचा वापर केला जातो.
केमिकल आॅक्सिजन, बायोकेमिकल आॅक्सिजन या सर्वच पातळ्यांवर तलावांमध्ये दिवसेंदिवस प्रदूषण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे हा तलाव मोठ्या जलपर्णीच्या विळख्यात आला असून, जीवसृष्टी धोक्यात आली आहे.