इको फ्रेंडली सजावटींवर भर
By admin | Published: August 28, 2014 04:33 AM2014-08-28T04:33:40+5:302014-08-29T11:25:57+5:30
घरोघरी विराजमान होणाऱ्या गणरायाच्या सजावटीसाठी कागद व कापडाद्वारे तयार केलेल्या कृत्रिम फुल आणि आकर्षक व रेखीव विविध प्रकारच्या साहित्याला पसंती दिली जात आहे
पिंपरी : घरोघरी विराजमान होणाऱ्या गणरायाच्या सजावटीसाठी कागद व कापडाद्वारे तयार केलेल्या कृत्रिम फुल आणि आकर्षक व रेखीव विविध प्रकारच्या साहित्याला पसंती दिली जात आहे. नियमितपणे होणाऱ्या जनजागृतीमुळे प्रदूषण करणाऱ्या वस्तंूचा वापर टाळत ‘इको- फ्रेंडली’ आरास करण्यावर गणेशभक्तांनी भर दिला आहे.
प्लॅस्टिक, तसेच थर्माकोल वस्तूंमुळे प्रदूषण वाढते. पर्यावरणप्रेमी संस्था, अभ्यासक सात्यताने पर्यारणपूरक उत्सवाबाबत
जागृती करीत आहेत. ‘लोकमत’नेही इको फ्रेंडली गणेशोत्सवाची
भूमिका मांडत सतत जनजागृती केली आहे. याचा परिणाम म्हणजे अनेक भाविक जागरूक झाले आहेत. त्यामुळे अशा सजावटीच्या वस्तूला मागणी वाढली आहे.
कागद, त्याचा लगदा, कापड, लाकूड, धागा, बांबू आदीचा वापर करून आकर्षक, रेखीव सजावटीच्या कलाकुसरीचे साहित्य बाजारपेठेत गणेशभक्तांचे लक्ष वेधत आहे. चौरंग, देव्हारे, नैवेद्याचे बॉक्स, तोरण, मखर, माळा, कागदी दुर्वा, जास्वंदाची फुले, कमळ असा विविध वस्तू आहेत.
महाराष्ट्र व पश्चिम बंगाल पद्धती एकत्रित करून मखरे बनविण्यात आली आहेत. गणेशोत्सवानंतर मखराचे विविध भाग वेगळे करून पुन्हा वापरता येतात. एक ते ६ फूट आकारात ही मंदिर व आसन पद्धतीचे मखरे उपलब्ध आहेत. पाचशे रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत त्याच्या किमती आहेत. कापडी फुले, रुद्राक्ष व लाकडी मण्यांचा वापर करून तयार केलेले विविध
प्रकारचे हार व माळा लक्ष वेधून घेतात. त्याचबरोबर छत्री, अंबर, कळस, सिंहासन, रंगीबेरंगी व चमकीचे कापड, झुरमुळ्या, फुलदाणी आदी साहित्य आहे.
पुठ्ठ्याच्या साहाय्याने तयार केलेले अष्टविनायक, सूर्यप्रकाश, कमल, मोर, सिंहासन, हत्ती, निसर्ग, इंद्रधनुष्य, अंबारी, गौरी, दगडी, हंसासन, मयूरासन आदी वेगवेगळ्या प्रकारात मखरे आहेत. ते विविध आकारांत उपलब्ध असून, १०० रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत आहेत. हे साहित्य मुंबईवरून मागविले जाते. दुकानात त्याची जोडणी केली जाते. मखरासोबत वेगवेगळ्या सुट्या भागांतही ते उपलब्ध आहेत. फुलाचे हार ५० ते २०० रुपये, कापडाची चुनरी १५ ते ८० रुपये मीटर आहे. फ्लॉवरपॉट ५० ते १५० रुपयांना आहे. मूर्तीखालचे आसनाचे कापड लाल, निळ्या, केसरी व पिवळ्या रंगांत असून, ते २५ पासून १५० रुपये नग आहे. (प्रतिनिधी)