पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:39 AM2018-08-27T00:39:25+5:302018-08-27T00:39:44+5:30
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे एन्व्हायर्न्मेंटल फोरम आॅफ इंडियाच्या वतीने यंदाही पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्यात येणार आहेत
बारामती : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे एन्व्हायर्न्मेंटल फोरम आॅफ इंडियाच्या वतीने यंदाही पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्यात येणार आहेत. यासाठी बारामतीमधल्या मएसोच्या कै. गजाननराव भिवराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कलाशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर पार पडले.
या शिबिरात इको-गणेशमूर्ती साकारण्याची संकल्पना, त्यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण यावर चर्चा करून प्रात्यक्षिक करण्यात आले. पुढील १५ दिवस हे शिक्षक आपापल्या शाळेत विद्यार्थ्यांना इको-गणेशमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तींमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत आपण सर्व जागरूक आहोत. परंतु आता केवळ जागरूक राहून चालणार नाही तर त्यादृष्टीने ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. म्हणून एन्व्हायर्न्मेंटल फोरम आॅफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून फोरम पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी बारामती आणि परिसरातल्या शाळांतील विद्यार्थ्यांनी मिळून २५०० पेक्षा जास्त इको-गणेशमूर्ती तयार केल्या, त्याला स्वत:च्या हाताने रंगरंगोटी करून आपल्या घरात स्थापित केले होते. यंदा ५,००० इको-गणेशमूर्ती साकारण्याचा फोरमचा संकल्प आहे.