पर्यावरणपूरक विसर्जनाला शासनाकडूनच हरताळ, शिक्षण विभागाचा फतवा, विद्यार्थ्यांच्या सहभागी होण्यावर आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 01:32 AM2017-09-10T01:32:35+5:302017-09-10T01:32:48+5:30
महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्याचे टाळावे, असे आदेश उच्च शिक्षणालयाकडून पुणे विभागातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.
- दीपक जाधव ।
पुणे : महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्याचे टाळावे, असे आदेश उच्च शिक्षणालयाकडून पुणे विभागातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने लगेच या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे.
औरंगाबाद खंडपीठाने एका याचिकेवर निर्णय देताना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्यास राज्य शासनाला सांगितले होते. त्यानुसार तत्कालीन आघाडी सरकारने हा कार्यक्रम शाळा, महाविद्यालय पातळीवर स्वीकारला होता.
मात्र पुणे उच्च शिक्षण विभागाकडून काढण्यात आलेल्या एका आदेशामुळे याला मोठा धक्का बसला आहे. उच्च शिक्षण विभागाचे सह संचालक विजय नारखेडे यांना २८ आॅगस्ट रोजी हिंदू जनजागृती समितीने एक पत्र दिले होते. त्यामध्ये महाविद्यालयातील तरुण पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करावे म्हणून लोकांवर दबाब टाकतात, त्यांना मनाई करावी, अशी मागणी होती. सहसंचालकांनी लगेच, महाविद्यालयांनी या पत्रानुसार चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी असे आदेश काढले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सहसंचालकांचे हे पत्र मिळाल्यानंतर त्यांनीही विद्यार्थ्यांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, असे निर्देश विद्यार्थी कल्याण मंडळ संचालकांच्या स्वाक्षरीने सर्व महाविद्यालयांना दिले.
- एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या घरच्या गणपतीचे मुलीच्या हस्ते पर्यावरणपूरक विसर्जन करून चांगला संदेश दिला असताना शिक्षण विभागाकडून त्याविरोधात कृती करण्यात आली आहे. ‘आॅनलाइन लोकमत’वर शनिवारी दुपारी याबाबतचे वृत्त सर्वांत पहिल्यांदा ब्रेक करण्यात आले. त्यानंतर याचे जोरदार पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.
अधिका-यांची चौकशी करून कारवाई व्हावी
औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने पर्यावरणपूरक गणेश विसर्जन हा कार्यक्रम स्वीकारला असताना शिक्षण विभागातील एखादा अधिकारी त्याविरोधात परस्पर आदेश काढत असेल तर हे गंभीर आहे.
- हमीद दाभोलकर, सरचिटणीस, अंधश्रद्धा निर्मूलन समिती
कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करणे धार्मिकतेशी विसंगत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यापासून थांबवावे असे पत्र हिंदू जनजागृती समितीने दिले होते. त्यानुसार तपासून कार्यवाही करावी, असे पत्र काढण्यात आले आहे.
- विजय नारखेडे, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग