पर्यावरणप्रेमी विद्यार्थ्यांनी केली दिवे घाटात स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 01:27 AM2018-12-16T01:27:04+5:302018-12-16T01:27:31+5:30
सहाशे विद्यार्थी सहभागी : चार गाड्यांद्वारे आठ टन कचरा गोळा
सासवड : दिवे घाटाचे सौंदर्य जपावे, घाटातून दिसणारा आजूबाजूचा निसर्ग सर्वांना बघता यावा, घाटात असणाऱ्या वनस्पतींचे व पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालय, सासवड येथील वाघिरे महाविद्यालय आणि महाराष्ट्र अॅकॅडमी अशा ६०० विद्यार्थ्यांनी दिवे घाटाची स्वच्छता केली.
पुण्याला इतर ठिकाणांशी जोडणाºया अनेक घाटांपैकी दिवेघाट महत्त्वाचा आहे. पर्यावरणीयदृष्ट्या, जैवविविधता असणारा, निसर्गसौंदर्य लाभलेला असा हा घाट आहे. मात्र अलीकडील काळात वाढती रहदारी, लोकसंख्या, कचरा आणि प्लॅस्टिकचे ढीग यामुळे घाटातील पर्यावरण आणि जैवविविधतेला धोका पोहोचत आहे. त्यामुळे ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून घाटाची स्वच्छता केली. अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वडकीपासून सुरुवात केली, तर वाघिरे महाविद्यालय एनसीसीचे विद्यार्थी मध्यभागी, तर वरच्या बाजूने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेला सुरुवात केली.
घाटाच्या सुरुवातीला लावलेल्या फलकाचे अनावरण बंडू जगताप, डॉ. नितीन घोरपडे, डॉ. शर्मिला चौधरी, अमित झेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. घाटाच्यावर लावलेल्या फलकाचे अनावरण कल्पना साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. स्वच्छताजागृतीसाठी फलकावर पर्यावरणवारी असे लिहिले असून येथे कचरा टाकू नये, अशी सूचनाही केली आहे. घाटामध्ये घरगुती कचरा, पाण्याच्या बाटल्या, जुने कपडे, सडलेल्या भाज्या, हॉटेलचा कचरा, टाकाऊ पदार्थ, वैद्यकीय असा विविध प्रकारचा कचरा विद्यार्थ्यांनी गोळा केला. आदर पूनावाला यांच्या मदतीने हा कचरा उचलला. यावेळी आदर पूनावाला यांच्या ४ गाड्यांद्वारे ८ टन कचरा विद्यार्थ्यांनी गोळा केला. परिसरातील नागरिकांकडून कामाबाबत समाधान व्यक्त होत आहे. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. सुभाष वाव्हळ, प्रा. दीपक जांभळे, डॉ. सतीश बोंगाणे यांनी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
पाणी वाचविण्याचे आवाहन :
पाणी पंचायतीच्या कल्पना साळुंके यांनी आपल्या संस्थेमार्फत असे अनेक उपक्रम घेतले जात असल्याचे सांगितले. पाण्यासाठी आम्ही काम करीत असून आपले पाण्याचे गणित कुठे तरी चुकत असून पाणी उपलब्धता आणि पाण्याचा वापर याचा नीट विचार करावा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
महत्त्वपूर्ण घाट
पुण्याला इतर ठिकाणांशी जोडणाºया अनेक घाटांपैकी दिवे घाट महत्त्वाचा आहे. पर्यावरणीयदृष्ट्या, जैवविविधता असणारा, निसर्गसौंदर्य लाभलेला असा हा घाट आहे. मात्र, अलीकडील काळात वाढती रहदारी, लोकसंख्या, कचरा आणि प्लॅस्टिकचे ढीग यामुळे घाटातील पर्यावरण आणि जैवविविधतेला धोका पोहोचत आहे.