पर्यावरणपूरक लाकडाचे ‘आकाशदिवे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 01:15 AM2018-10-25T01:15:24+5:302018-10-25T01:15:28+5:30
एकीकडे महाराष्ट्र सरकारने प्लॅस्टिकबंदी केली, तर दुसरीकडे सबंध भारतीय बाजारपेठेत चिनी बनावटीच्या वस्तू खरेदी करण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिला.
- युगंधर ताजणे
पुणे : एकीकडे महाराष्ट्र सरकारने प्लॅस्टिकबंदी केली, तर दुसरीकडे सबंध भारतीय बाजारपेठेत चिनी बनावटीच्या वस्तू खरेदी करण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिला. याचा फायदा मात्र स्थानिक कामगारांना होऊन त्यांच्यातील सर्जनशीलतेला संधी मिळाल्याचे दिसून येत आहे. याचे उदाहरण म्हणजे प्लॅस्टिकबंदीमुळे यंदा दिवाळीतील प्रमुख आकर्षण असणाºया आकाशदिव्यांची वेगवेगळ््या प्रकारे निर्मिती करण्यात आली आहे. सध्या बाजारात प्लॅस्टिकला पर्याय म्हणून चक्क लाकडी कंदील आले आहेत. एमडीएफ प्लायपासून बनविलेले हे कंदील पूर्णपणे विघटनशील अशा स्वरुपाचे आहेत.
दिवाळीला अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना बाजारात खरेदीकरिता ग्राहकांची गर्दी दिसू लागली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी केल्यानंतर त्यामुळे दिवाळीच्या वेळी खरेदी करण्यात येणाºया विविध वस्तूंवर त्याचा परिणाम होईल, असे बोलले जात होते. प्रत्यक्षात बाजारात त्या वस्तुंना पर्याय उपलब्ध झाले आहेत. कागद, ज्यूट, कापड इतकेच नव्हे, तर बांबूपासूनदेखील आकर्षक व सुबक आकारातील कंदील आणि इतर वस्तू ग्राहकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत.
लाकडी आकाशदिव्यांची प्रथमच विक्री करणारे अमित बढाई यांंनी सांगितले, की एमडीएफ प्लायपासून आकाशदिवे तयार केले असून ते विघटनशील आहेत. लाकडाचा भुसा, हत्तीचे शेण व काही रसायनांचा वापर करून हे प्लाय बनविण्यात येते. गरजेनुसार ते वॉटरप्रुफदेखील करून घेता येते. २.५ एमएमपर्यंत जाडी असणाºया प्लायची गुणवत्ता व टिकाऊपणा हा त्याच्या जाडीवरून मोजला जातो. अत्याधुनिक यंत्राच्या मदतीने अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत ते तयार करता येतात.
लाकडाबरोबरच ज्यूट, कापड आणि कागद यापासूनदेखील आकाशदिवे बनवले जात आहेत. गेल्या आठ वर्षांपासून ज्युटपासून आकाशदिव्यांचा व्यवसाय करणारे अजय चव्हाण म्हणाले, की ज्यूट, कापड व कागदापासून आकाशदिवे हाताने बनवावे लागतात. त्यात एका आकाशकंदिलाकरिता पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ लागतो. ज्यूटचे आकाशकंदील २५० पासून १२०० रुपयांपर्यंत आहेत, तर सिल्क प्लायपासून बनविण्यात आलेल्या कंदिलांची किंमत २५० पासून ७५० पर्यंत आहे. या आकाशकंदिलांमध्ये पेशवाई कंदील, न्यू लोटस कंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
>आकाशदिव्यांना रंगवता येण्याची सोय
लाकडी आकाशदिवे तयार करण्यासाठीचा कच्चा माल हा मुंबई व पुण्यातून खरेदी केला जातो.
ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार या आकाशदिव्यांना रंगवता येण्याची सोय आहे. मात्र त्याकरिता केवळ स्प्रे कलरचा उपयोग करावा.
आकर्षक रंगाच्या कागदांनीदेखील त्याची सजावट करता येते. सतत पाण्यात हे प्लाय भिजत राहिल्यास ते फुगून त्याचे विघटन होण्यास सुरुवात होते.
आता बाजारात फुले, मोर, कलश यांच्या आकारातील आकाशकंदील बाजारात आहेत.
>कागद, कापड आणि बांबूंच्या वस्तूंना पसंती
प्लॅस्टिकबंदी झाली. मात्र त्यामुळे ग्राहकांच्या खरेदीवर काही परिणाम झाला असे नाही.
त्यांना पर्यावरणपूरक वस्तुंचा पर्याय नसल्याने ते प्लॅस्टिक वस्तुंना प्राधान्य देत होते. मात्र आता कागद, कापड आणि बांबूंच्या दिवाळीत उपयोगी वस्तुंना चांगलीच मागणी आहे.
विशेष म्हणजे ग्राहक त्याला पसंती देत आहेत. मातीच्या पणत्या, मेणाच्या सुगंधी पणत्या स्टीलच्या छोट्या वाटीत विक्रीस ठेवले आहेत.
प्लॅस्टिकऐवजी स्टीलचा केलेला उपयोग ग्राहकांना आवडत असल्याचे बोहरी आळीतील विक्रेते कृष्णकुमार ठाकूर सांगतात.