अभियांत्रिकी महाविद्यालयांचे अर्थचक्र बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:11 AM2021-01-20T04:11:59+5:302021-01-20T04:11:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना आणि लांबलेली अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया त्यामुळे जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालेय अद्याप सुरू झाले नाहीत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना आणि लांबलेली अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया त्यामुळे जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालेय अद्याप सुरू झाले नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडे शुल्क जमा केले नाही. मात्र, त्यामुळे शैक्षणिक संस्थांचे अर्थचक्र पूर्णपणे बिघडले आहे. काही प्राध्यापकांना वेतनाविना काम करत आहेत तर काहींना पन्नास टक्के वेतनावर समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे शासनाने अभियांत्रीकी महाविद्यालेय सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.
कोरोनाच्या पर्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. मात्र, इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र,अद्याप अभियांत्रिकी महाविद्यालये बंद आहेत. कोरोना व मराठा आरक्षणामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लांबली. मात्र, त्यामुळे प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रवेश पूर्ण झाले नाही. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी न दिल्याने तिस-या व चौथ्या वर्षाचे विद्यार्थी सुध्दा महाविद्यालयात येत नाहीत. त्यामुळे एकाही विद्यार्थ्याने शुल्क जमा केले नाही.
चौकट
कर्मचाऱ्यांनी जगावे कसे ?
पुणे जिल्ह्यात दोन महाविद्यालये वगळता उर्ववित ७२ अभियांत्रिकी महाविद्यालये विना अनुदानित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून जमा होणाऱ्या शुल्कातूनच प्राध्यापकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन केले जाते. शुल्क जमा होत नसल्याने शिक्षण संस्था आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच समाज कल्याण विभागाने शिक्षण संस्थांना शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम दिलेली नाही. परिणामी संस्थांकडे असणारा इतर निधीही संपत आला आहे. त्यामुळे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चौकट
जिल्ह्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये : २
खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये : ७२
विद्यार्थी क्षमता : ३५,५४९
प्राध्यापक संख्या : सुमारे एक हजार
शिक्षकेतर कर्मचारी संख्या : सुमारे ७००
---------------------------
ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू झाली पाहिजेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यानंतरच महाविद्यालयाकडे शुल्क जमा होईल. तसेच समाज कल्याण विभागाकडे शिष्यवृत्तीची रक्कमही प्रलंबित आहेत. त्यामुळे सध्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- व्ही. एन. चंद्रात्रे, प्राचार्य, व्ही. एन. नाईक कॉलेज