अर्थव्यवस्था बळकट होईल
By Admin | Published: June 10, 2017 02:20 AM2017-06-10T02:20:25+5:302017-06-10T02:20:25+5:30
आपण इतर देशांवर अवलंबून असून साधनसामग्री आयात करतो. मेक इन इंडियाच्या चळवळीत अंटार्क्टिका महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आपण इतर देशांवर अवलंबून असून साधनसामग्री आयात करतो. मेक इन इंडियाच्या चळवळीत अंटार्क्टिका महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते. अंटार्क्टिकाबाबत जागृती वाढण्याची गरज असून माध्यमांनी या विषयावर सातत्याने प्रकाश टाकला पाहिजे. अंटार्क्टिकाशी संबंध प्रस्थापित करुन भारतीय अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते, असे मत एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
पहिले भारतीय अंटार्क्टिक स्टेशन दक्षिण गंगोत्री येथे स्टेशन कमांडर म्हणून नेतृत्व केलेल्या लेफ्टनंट कर्नल डॉ. जगदीश खाडिलकर लिखित ‘अंटार्क्टिका - द फ्रोझन काँटिनेंटस एनव्हायर्नमेंट चेंजिंग लॉजिस्टिक्स टू इंडिया’ या पुस्तकाचे प्रकाशन सिम्बायोसिस संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे आणि ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे उपस्थित होते. ब्लूम्सबरी पब्लिशिंग इंडिया लिमिटेड या संस्थेने पुस्तक प्रकाशित केले आहे.
गोखले म्हणाले, ‘अंटार्क्टिका खंडावरील हालचाली योग्य नाहीत. भारताचे तेथील अस्तित्व महत्त्वाचे आहे. अंटार्क्टिकाकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास त्याचा सुरक्षेच्या दृष्टीने देशाला फायदा होऊ शकतो. अंटार्क्टिका येथील मासे अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरू शकतात. तैवानसारखे अनेक देश या जोरावर आपली अर्थव्यवस्था बळकट करत आहेत. अंटार्क्टिका हे भारतापासून ३० हजार किलोमीटर अंतरावर आहे. आपल्याकडील मान्सूनच्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा आहे.’
मेधा रबडे यांनी सूत्रसंचालन केले. ललिता मराठे यांनी
आभार मानले.