भाजपच्या काळात १२१ नेत्यांवर ईडीची कारवाई , पण एकाही भाजप नेत्याचा समावेश नाही - शरद पवार

By राजू हिंगे | Published: February 11, 2024 02:53 PM2024-02-11T14:53:58+5:302024-02-11T15:06:11+5:30

गेल्या १८ वर्षांमध्ये १४७ नेत्यांची चौकशी झाली असून यापैकी ८५ टक्के नेते हे विरोधी पक्षातील आहेत

ED action against 121 leaders during BJP but not a single leader Sharad Pawar | भाजपच्या काळात १२१ नेत्यांवर ईडीची कारवाई , पण एकाही भाजप नेत्याचा समावेश नाही - शरद पवार

भाजपच्या काळात १२१ नेत्यांवर ईडीची कारवाई , पण एकाही भाजप नेत्याचा समावेश नाही - शरद पवार

पुणे : भाजपकडुन ईडीच्या माध्यमातुन सत्तेचा गैरवापर केला जात आहे.  २०१४ ते २०२३ या काळात ईडीकडून एकूण सहा हजार केसेस नोंदवण्यात आल्या.  त्यापैकी केवळ २५ प्रकरणांमध्ये तथ्य असल्याचे आढळून आले. मात्र, या २५ पैकी फक्त दोघांना शिक्षा झाली. ईडीच्या या सगळया कामासाठी जवळपास ४०४ कोटी रुपये खर्च झाले. गेल्या  १८ वर्षांमध्ये १४७ नेत्यांची चौकशी झाली. यापैकी ८५ टक्के नेते हे विरोधी पक्षातील आहेत. भाजपच्या आठ वर्षाच्या काळात १२१ नेत्यांवर ईडीची कारवाई झाली. परंतु, ईडीने कारवाई केलेल्या लोकांमध्ये भाजपच्या एकाही नेत्याचा समावेश नाही. भाजपाच्या नेत्यांविरोधातील चौकशी थांबवण्यात आली. याचा अर्थ काय काढायचा? असा सवाल राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद  पवार यांनी  केला. 

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्यात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते  बोलत होते. भाजपा सत्तेत आल्यानंतर आठ वर्षांत १२१ नेत्यांवर कारवाई करण्यात आली. यात एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये असलेले १४ मंत्री, २४ खासदार, २१ आमदार, ७ माजी खासदार यांच्यावर कारवाई करण्यात आली असे सांगुन शरद पवार म्हणाले, “आज आपण वेगळ्या स्थितीतून जात आहोत. केंद्रातील सत्ता एका पक्षाच्या हातात आहे. उत्तरेकडील राज्यांचीही सत्ता भाजपाच्या हातात आहे. त्यांची धोरणं सामाजिक ऐक्याला धक्का पोहोचवणारी आहेत. या धोरणांचा पुरस्कार त्यांच्याकडून केला जातो.  लोकसभेचं कामकाज संपलं. पंतप्रधानांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला समजेल की त्यांनी काहीही विधायक सांगितले नाही. दोन दिवसांपूर्वी त्यांनी राज्यसभेत भाषण केले होते. त्यावेळीही त्यांनी इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू यांचं राहणं यावरच भाष्य केलं. पंतप्रधानांनी इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका केली. ज्या कुटुंबातील व्यक्तींनी स्वातंत्र्य आंदोलनात १३ वर्षे तुरुंगात काढली. स्वातंत्र्यानंतर लोकशाहीचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केले. देशाला लोकशाही शासन दिले त्या लोकांवर व्यक्तिगत हल्ले करुन पंतप्रधान मोदी यांनी काय साधले?, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.  ज्यांनी देशाला दिशा दिली, देशासाठी कष्ट केले त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले करणे हे शहाणपणाचं लक्षण नाही असेही त्यांनी सांगितले. 

राज्याच्या विकासासाठी पक्ष सोडला म्हणणाऱ्यांच्या दाव्यात तथ्य नाही 

काही लोक राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत गेलो असे काहीजण सांगत आहेत. मात्र, हा दावा अजिबात सत्य नाही. काही नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु होती. ती चौकशी सत्तेत गेल्यावर बंद झाली. त्यामुळे विकासासाठी पक्ष सोडला, असे म्हणणे चूक आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्यावर निशाणा साधला.

Web Title: ED action against 121 leaders during BJP but not a single leader Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.