माजी मंत्री अनिल देशमुखांच्या निवासस्थानी ईडीची कारवाई; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 12:49 PM2021-06-25T12:49:54+5:302021-06-25T13:01:07+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी भाजपने केली आहे, यावर देखील दिलीप वळसे पाटील यांनी मोठं भाष्य केले आहे.
पुणे: माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी शुक्रवारी(दि.२५) ईडीने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. यावरून पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपांनी राजकारण तापण्याची शक्यता आहे. ईडीच्या देशमुखांवरील कारवाईवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी भाजपने केली आहे, यावर देखील मोठं भाष्य केले आहे.
पुण्यात दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्राशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी वळसे पाटील यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने केलेल्या कारवाईवर भाष्य करताना वळसे पाटील म्हणाले, याबाबत जास्त बोलू इच्छित नाही, संबंधित यंत्रणा तपास करत आहे. तसेच भाजपने त्याच्या कार्यकरणीत काय ठरवायचं हा त्यांचा प्रश्न आहे.मुळात आज राज्यामध्ये कोरोनासारखे विषय आहेत,सामजिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक प्रश्न आहेत.
त्यामुळे भाजपकडून चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. कोणी मागणी केली म्हणून लगेच उद्या तसे होईल असं नाही. पण राज्यात सीबीआयला चौकशीला यायचं असेल तर राज्य सरकारची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे असेही वळसे पाटील म्हणाले.