ईडी, सी बी आय, कुठलीही नोटीस आली नाही; वळसे पाटलांनी सांगितलं सत्तेत जाण्याचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 03:58 PM2023-07-09T15:58:06+5:302023-07-09T15:58:30+5:30
शरद पवार देशातील उत्तुंग नेता असताना महाराष्ट्रातील जनतेने एकदा सुद्धा पवारांच्या ताकदीवर राज्य आणून दिले नाही
मंचर (पुणे) : डिंभे धरणाचे पाणी बोगदा करून पलीकडे नेले जाणार आहे. धरणाच्या तळात बोगदा करण्याचा निर्णय झाला आहे. घोडनदीवरील 65 बंधाऱ्यांना धरणातून पाणी सोडले जाणार नाही. परिणामी या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार आहे. या ज्वलंत प्रश्नासाठी सत्तेत गेलो आहे. मला ईडी,सी बी आय, इन्कम टॅक्सची कुठलीही नोटीस आलेली नाही. असे स्पष्ट मत दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केले आहे.
समाजासाठीच हा निर्णय घेतला आहे. शेवटच्या श्वासापर्यंत तालुक्यातील जनतेला कमी पडू देणार नाही व अंतरही देणार नाही. असही ते यावेळी म्हणाले आहेत. मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात आज वळसे पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल वळसे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील चालू घडामोडी बाबत भाष्य केले.
वळसे पाटील म्हणाले, शरद पवार देशातील उत्तुंग नेता असताना महाराष्ट्रातील जनतेने एकदा सुद्धा पवारांच्या ताकदीवर राज्य आणून दिले नाही. आघाडीचे सरकार आले. राष्ट्रवादीचे सरकार आले पाहिजे त्यातून हा निर्णय झाला. काय निर्णय घ्यायचा हा पेच माझ्यापुढे होता. त्यावेळी डिंभे धरणाचे पाणी बोगदा करून पलीकडे नेण्याचा निर्णय झाला. पाणी ही वैयक्तिक मालकी नाही. मात्र सुरुवातीला 712 मीटरवर बोगदा घेण्याचे ठरले होते. आघाडी सरकार गेल्यानंतर सदरचा बोगदा धरणाच्या तळात काढण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत घेतला. बोगदा व्हायचा तेव्हा होईल मध्यंतरी सरकारने आंबेगाव, जुन्नर, शिरूर, पारनेर तालुक्यातील 65 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात धरणातून पाणी न सोडण्याचा निर्णय घेतला. या परिसरात पाच साखर कारखाने आहेत. उसामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली झाली आहे. दुष्काळी भाग बागायती झाला आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुखी झाले आहे.