Ed Enquiry In Pune: पुण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांची ईडीकडून तब्बल ७ तास चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 08:06 PM2021-12-17T20:06:37+5:302021-12-17T20:07:05+5:30
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आयपीएस बदली रॅकेटप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आता पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
पुणे: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आयपीएस बदली रॅकेटप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आता पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. पुणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांची गुरुवारी सात तास चौकशी करण्यात आली. त्यापाठोपाठ शुक्रवारी अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची चौकशी करण्यात येत आहे.
गुरुवारी पुणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांना समन्स बजावत चौकशीला बोलण्यात आले होते. त्यानुसार ते दुपारी एकच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात पोहोचले. सात तास चौकशी करीत त्यांचा जबाब नोंदविण्यात आला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) प्राथमिक तपास करुन गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे ईडी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून तपास करीत आहे. या प्रकरणात देशमुख न्यायालयीन कोठडीत आहेत.
देशमुख हे गृहमंत्री असताना करण्यात आलेल्या बदल्यांबाबत ७ डिसेंबरला राज्याचे माजी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे यांची सहा तास चौकशी करीत त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यापाठोपाठ ५ पोलीस उपायुक्तांना समन्स बजाविण्यात आल्याची माहिती आहे.