बारामती अॅग्रोवर ED ची धाड, फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, स्वत:ला शहीद...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 06:00 PM2024-01-05T18:00:46+5:302024-01-05T18:01:35+5:30
पिंपळी (ता. बारामती)येथील बारामती अॅग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड टाकल्याची प्राथमिक माहिती आहे
पुणे/मुंबई - आमदार रोहित पवार यांची मालकी असलेल्या बारामती अॅग्रो कंपनीवर आज ईडीने धाड टाकल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, बारामती अॅग्रोवर ईडीने टाकलेल्या धाडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना अजित पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. तर, युवा संघर्ष यात्रा काढल्यामुळेच त्यांच्यावर अशी कारवाई होत असल्याचा आरोप रोहित पवार समर्थकांकडून होत आहे. त्यावर, आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे.
पिंपळी (ता. बारामती)येथील बारामती अॅग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड टाकल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सकाळी कंपनीत केंद्रीय तपास यंत्रणा पोहोचल्या. या ठिकाणी माध्यम प्रतिनिधी माहिती घेण्यास तळ ठोकून आहेत. मात्र, या धाडीबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. तसेच केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचा देखील संपर्क होऊ शकलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात बोलताना मला माहिती नसल्याचं म्हटलं.
रोहित पवार यांनी संघर्ष यात्रा काढली, त्यामुळेच त्यांच्यावर अशी कारवाई होत असल्याचा आरोप केला जातोय?, असा प्रश्न गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना
हे सगळे विनाकारण शहीद होण्याचे प्रकार आहेत, स्वत:ला घोषित करण्याचे, असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
हे सगळे विनाकारण शहीद होण्याचे प्रकार आहेत, स्वत:ला घोषित करण्याचे. रेड झालीय, नाही झाली, याबाबत मला काही माहिती नाही. त्यांचा बिझनेस आहे, बिझनेस ते करतात, अशा गोष्टी बिझनेसमध्ये होत असतात. त्यांनी काही केलंच नसेल तर त्यांना घाबरण्याची गरजच नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच, विनाकारण याला राजकारणाशी ओढण्याचं काय कारण आहे?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
🕔 5.10pm | 5-1-2024 📍 Pune | संध्या. ५.१० वा. | ५-१-२०२४ 📍 पुणे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 5, 2024
LIVE | Media interaction.#Maharashtra#Punehttps://t.co/Se9AZyazxl
पुण्यातील घटनेवर स्पष्टीकरण
पुण्यात झालेल्या कुख्यात गुंडाच्या हल्ल्यावरही गृहमंत्र्यांनी भाष्य केलं. या घनटेत, कुख्यात गुंडाच्या साथीदारानेच त्याला ठार मारलं आहे. या घटनेमुळे कुठेही गँगवार होणार नाही. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, असे उत्तर फडणवीसांनी दिले. तर, आमदाराने पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली, यावर बोलताना मला अद्याप संपूर्ण माहिती नाही, माहिती घेऊन मी सांगतो, असेही फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात आव्हाड यांनी रोहित पवार यांचा शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये आव्हाड म्हणाले की, रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ईडीची धाड पडल्याची बातमी समजली. रोहित पवार हे शरद पवार यांच्यासोबत निष्ठेने आणि ताकदीने उभे राहिले त्याचे हे फळ आहे. वाईट याचेच वाटते की, यात आपलेच "घरभेदी" सहकारी सामील आहेत. परंतु मला विश्वास आहे की, रोहित पवार हे या सर्व दबावतंत्राला बळी तर पडणारच नाहीत, उलट अजून ताऊन सुलाखून बाहेर पडतील.