शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर ईडीचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:16 AM2021-01-16T04:16:14+5:302021-01-16T04:16:14+5:30
पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापे टाकले. बँकेशी संबंधित असलेल्या पुणे आणि लगतच्या ...
पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापे टाकले. बँकेशी संबंधित असलेल्या पुणे आणि लगतच्या विविध भागांमध्ये कारवाई करीत महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
बँकेमधील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यासोबतच आर्थिक गुन्हे शाखेकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. रिझर्व्ह बँकेच्या २०१८-१९ सालातील आर्थिक व्यवहारांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये ७२ कोटी रुपयांची अनियमितता आढळली होती. त्यानंतर संचालक मंडळ बरखास्त करुन फौजदारी कारवाई करण्यात आली होती. माजी आमदार आणि संचालक अनिल शिवाजीराव भोसले, सूर्याजी पांडुरंग जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दत्तू पडवळ यांच्यासह अन्य काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने ‘मनी लाँड्रिंग प्रोटेक्शन २००२ (पीएमएलए)’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भोसले यांच्यासह अन्य आरोपींवर बँकेच्या पैशांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळपास ७१ कोटी रुपयांची तफावत असल्याचे आढळून आली असून बँकेने अंतर्गत लेखापरीक्षण, आरबीआय ऑडिट आणि तपासणी ऑडिटच्या निकषांचे योग्य पालन केले नाही. कर्ज मंजूर होण्यापूर्वी कर्जदार आणि जामिनदारांचे आर्थिक विवरणपत्र आणि परतफेड करण्याची क्षमता विचारात घेतली नव्हती. बहुतांश प्रकरणांमध्ये बँकेने पडताळणी केलेली नाही. मालमत्तेवरील कर्जासाठी आवश्यक असलेला नवीनतम मूल्यांकन अहवाल मिळालेला नाही.
पैसे वाटप करताना बँकेने आरबीआय तसेच सहकार खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचे ईडीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. भोसले, जाधव, पडवळ यांनी बेकायदेशीरपणे आरटीजीएस / एनईएफटीमार्फत पैसे हस्तांतरित केले. यासोबतच ९० टक्क्यांपेक्षा अधिक कर्जे एनपीए असल्याचेही निदर्शनास आले आहे. ईडीने शुक्रवारी टाकलेल्या छाप्यात पीएमएलएअंतर्गत डिजिटल पुराव्यांसह अपहारासंबंधीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.